काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गिरमे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : ता. २५

काँग्रेसचे एकनिष्ठ ज्येष्ठ नेते, एक आदर्श शेतकरी  जामखेड पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक नागनाथ गिरमे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शनिवारी पहाटे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७० होते.

काँग्रेसचे एकनिष्ठ व ज्येष्ठ नेते अशोक गिरमे यांनी जामखेड ग्रामपंचायत सदस्य, जामखेड पंचायत समिती सदस्य व कडा सहकारी साखर कारखान्याचे संचालक या पदांवर अनेक वर्ष काम केले. त्याचबरोबर ते एक आदर्श शेतकरी म्हणून प्रसिद्ध होते. माळरानावर अनेक प्रकारचे वेगवेगळी प्रयोग करून त्यांनी फळबागा फुलबागा फुलविल्या. आपल्या शेतातील कोणतं कोणतं फळ व कोणती ना कोणती भाजी वर्षभर बाजारात कशी विकता येईल याचे ते सूत्रबद्ध नियोजन नेहमी करत असत. म्हणून अनेक पत्रकारांनी संपादकांनी त्यांच्यावर त्यांच्या फळबागांविषयी वेळोवेळी लिखाण केले. त्या दैनिकांची कात्रणं करून त्याचा संग्रह करणे हा त्यांचा छंद होता. 

गेल्या चार दिवसापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. नगर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांना पहाटे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे भाऊ रमेश गिरमे, बहीण शोभा ससाने, मुलगा सागर गिरमे, शितल खामकर, दिपाली गवळी, व कल्पना भानोसे या तीन मुली, पुतणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल गिरमे असा परिवार आहे. 

      अशोक गिरमे यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. तर संपूर्ण जामखेड शहरातून त्यांच्या अचानक जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सकाळी श्रीनागेश्वर नगर मधील वैतरणा नदीच्या तीरावर असलेल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post