पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यावरून आ.रोहित पवार आणि आ.राम शिंदे यांचा संघर्ष टोकाला


जामखेड प्रतिनिधी 
प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी 31 मे रोजी क्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज चोंडी येथे जाहीर केले. 

चौंडी येथे 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होते. मागील वर्षी चौंडी येथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रम झाला होता. त्यावेळी या ठिकाणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि पोलीस प्रशासनामध्ये मोठा संघर्ष झाला होता. त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. 

 मधल्या काळात राजकीय घडामोडीनंतर राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे यावर्षी विधानपरिषदेचे भाजपचे आमदार राम शिंदे यांनी हा सोहळा हा शासकीय खर्चातून करण्याची परवानगी मिळवली असून या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत. मात्र याच वेळेस दरवर्षीप्रमाणे चौंडी या गावात अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त पारंपरिक मिरवणुकीसाठी आणि इतर कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी परवानगी मागितली होती मात्र जिल्हा प्रशासनाने ही परवानगी नाकारल्यानंतर आता आम्ही कसल्याही परिस्थितीत मिरवणूक काढूच असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. प्रशासनावर सरकारचे प्रचंड दडपण असल्याचा आरोपही आमदार रोहित पवार यांनी केला आहे. 
 
मागील वर्षी महाविकास आघाडीची सत्ता असताना गोपीचंद पडळकर यांना अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला चोंडीमध्ये प्रवेश करण्यापासून अडवण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुढच्या वर्षीची जयंती आम्हीच साजरी करू असे भाकीत केले होते आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनीही या विधानाला दुजोरा दिला होता योगायोगाने सत्तांतर झाल्यामुळे यावर्षीचा जयंती उत्सव राम शिंदे यांनी ताब्यात घेतला असल्याचे एकूण परिस्थितीवरून दिसून येत आहे. 
या सोहळ्यावरून आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांचा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे. 

 

Post a Comment

Previous Post Next Post