पूर्वी लोकांजवळ पैसे नसायचे परंतु माणुसकी होती - रामदास फुटाणे


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
    "माझे अनेक सत्कार झाले परंतु गावकऱ्यांनी केलेला सत्कारामध्ये विशेष प्रेम असतं. गावातल्या लोकांनी दिलेल्या शुभेच्छांमध्ये खूप ताकद असते. पूर्वी लोकांजवळ पैसे नसायचे परंतु माणुसकी होती. त्या काळात कुणी कुणाची जात पाहत नव्हते " असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व चित्रपट निर्माते दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनी येथे केले.

    जामखेड चे भूमिपुत्र जेष्ठ कवी व सिने दिग्दर्शक निर्माते रामदास फुटाणे यांचा जामखेडच्या ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते रामदास फुटाणे उर्फ जामखेडचे 'नाना' यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक रमेश गुगळे, चित्रपट निर्माते रणजीत गुगळे, ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख ,स्नेहालय चे गिरीश कुलकर्णी, द पीपल एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, प्राचार्य श्रीकांत होशिंग, बाळासाहेब पारखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, अशोक सिंगवी, सुरेश भोसले, महेश नगरे, मंगेश आजबे, डॉ. प्रताप गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार दत्ता वडे, अमित चिंतामणी उपस्थित होते. 
   

  सत्काराला उत्तर देताना रामदास फुटाणे आपल्या भाषणात म्हणाले "माझ्या कार्याची पावती म्हणून मला जगभरात अनेक पुरस्कार मिळाले अनेक सत्कार झाले परंतु गावकऱ्यांनी केलेला सत्कारामध्ये विशेष प्रेम असतं. गावातल्या लोकांनी दिलेल्या शुभेच्छांमध्ये खूप ताकद असते. एकेकाळी जामखेडला केवळ नागपंचमीमुळे ओळख होती. जी नागपंचमी आपल्यासारख्याला आवडत नाही तोच विषय महाराष्ट्रात सर्वत्र प्रसिद्ध होता. त्यामुळे मी ठरवले होते जामखेडला जायचे तर नागपंचमी सोडून इतर वेळेला जायचे."

    सत्कारदरम्यान आनंद देशमुख यांनी रामदास फुटाणे यांची प्रकट मुलाखत घेतली." यावेळी नाना म्हणाले जामखेडचे जुने कोर्ट येथे काही वर्ग भरत होते त्या शाळेत माझे आठवीपर्यंत शिक्षण झाले. नंतर पुढील शिक्षण लना होशिंग या विद्यालयात झाले. त्यावेळी मला चित्रकलेची आवड होती. आमची परिस्थिती फार चांगली नव्हती आठवीपर्यंत माझ्या पायात चप्पल नव्हती. नागराज मंजुळे आणि माझी सारखीच परिस्थिती होती. जामखेड तालुका त्यावेळी कर्जबाजारी असायचा लोकांजवळ पैसे नसायचे परंतु माणुसकी होती. त्या काळात कुणी कुणाची जात पाहत नव्हते जामखेडच्या दोन गोष्टी त्या वेळेला प्रसिद्ध होत्या. एक तर वारकऱ्यांचे कीर्तन आणि दुसरी म्हणजे बायका नाचवणे. आपल्या देशातील लोकांना आता फक्त पैसा हवा आहे. प्रत्येकाला वाटतं गौतम आदानी सारखा पैसा असावा. आणि गौतमी पाटील चा कार्यक्रम रोज असावा. त्यांनी अनेक राजकारणातले किस्से सांगितले व त्यांच्या नावाजलेल्या कवितांचे वाचन केले त्यांच्या कवितांनी जामखेडकर मंत्रमुग्ध झाले. श्री रामदास फुटाणे यांना गौरव पत्र देण्यात आले त्याचे ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी वाचन केले. 

नागराज मंजुळे आपल्या भाषणात म्हणाले
"जामखेडचे भूमिपुत्र असणारे जेष्ठ कवी व सिने दिग्दर्शक रामदास फुटाणे उर्फ नाना यांची जगात ख्याती आहे. त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षाने भरलेले आहे. त्यांनी काढलेला पहिला चित्रपट सामना हा खूप गाजलेला चित्रपट आहे. चित्रपट काढायला पैसे लागतात परंतु या माणसाकडे पैसे नसतानाही यांनी पहिला चित्रपट काढला. नवीन पिढीला नानांकडून खूप काही घेण्यासारखा आहे. नाना माझे आदर्श आहेत. रामदास फुटाणे हे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांचे चित्रपटसृष्टीमध्ये खूप मोठे खूप मोठे योगदान आहे. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांना पुरस्कार दिले. नानांनी अनेकांना पुरस्कार दिले व त्यांच्यामुळे अनेक पुरस्कार आजही टिकून आहेत. स्वतःजवळ पैसे नसताना त्यांनी पहिला चित्रपट काढण्याचे धाडस केले. हा आदर्श आजच्या नवीन पिढीने घेतला पाहिजे. माझ्या जीवनामध्ये माझ्या यशामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. मला पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी माझे तोंड भरून कौतुक केले व मला प्रोत्साहन दिले. जामखेड मधील रामदास फुटाणे व चित्रपट निर्माते रंजीत गुगळे हे दोन्ही व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. "
यावेळी रमेश गुगळे गिरीश कुलकर्णी यांचे भाषण झाले. 
    क्रमाचकार्यक्रम यशस्वीतेसाठी रविंद्र कडलग,मुकूंद राऊत सर, गौरव फुटाणे , दिगांबर फुटाणे , ऋतूराज फुटाणे व अमोल फुटाणे व समस्त शिंपी समाज , जामखेड यांनी विशेष परिश्रम घेतले

⤵️



Post a Comment

Previous Post Next Post