राज्यस्तरीय जुनिअर तायक्वांदो स्पर्धेत पुणे प्रथम
रत्नागिरी- तायक्वांदो हा सर्वाधिक झपाट्याने लोकप्रिय होत असलेला खेळ असून एवढ्या शिस्तबद्ध स्पर्धा यापूर्वी मी कधी पाहिल्या नाहीत, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेला सदिच्छा भेट प्रसंगी काढले. यावेळी महाराष्ट्रातील गुणवंत राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता खेळाडूंचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याने प्रथम कोल्हापूर द्वितीय तर रत्नागिरी संघाने तृतीय क्रमांक मिळविला.
तायक्वांदो हा अधिकृत क्रीडा प्रकार असून शासनाकडून हा खेळ प्रत्येक शाळा व महाविद्यालयापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्न करेल. तायक्वांदो या खेळातून करिअरच्या संधी असून हा खेळ स्वसंरक्षणासोबतच रोजगार मिळवून देणारा व शासकीय सेवेत संधी मिळवून देणारा खेळ असल्याने याच पद्धतीने तायक्वांदो खेळ प्रोफेशनल पद्धतीने विकसित होत राहावा, या खेळाचा इव्हेंट होऊ नये, असे उदगार ही यावेळी उदय सामंत यांनी काढले.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई व रत्नागिरी स्पोर्ट्स तायक्वांदो असोसिएशन या मान्यता प्राप्त संघटनेच्या अंतर्गत युवा सेना रत्नागिरी यांच्याकडून राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा रत्नागिरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे दोन दिवसांपासून सुरू आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पर्धेला भेट देऊन तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्य संघटनेच्या वेबसाईटचे उदघाटन केले. यावेळी शिवछत्रपती क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित मिलिंद पठारे (पुणे), तायक्वांदो खेळात संशोधन केलेले राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे (बीड), शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रवीण बोरसे (पुणे), आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील (रायगड), राज्य संघटनेचे उपाध्यक्ष धुलीचंद मेश्राम (गोंदिया), राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष तथा रत्नागिरी स्पोर्ट्स तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा (रत्नागिरी), राज्य संघटनेचे सदस्य अजित घारगे (जळगाव), राजेश महाजन (उस्मानाबाद) व विनायक ऐनापुरे (सांगली), प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी विशाल घोडके, शिवसेनेचे विभाग प्रमुख संजय नाईक व राहुल साळवी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष डॉ.अविनाश बारगजे यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले व पालकमंत्री उदय सामंत यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या अमेय सावंत, विधी गोरे, तनिष्का काळे, श्रुतिका टकले, अभिषेक सुकाळे, ऋतुराज मते, त्रिशा मयेकर, सुरभी पाटील, जानवी माझीरे या खेळाडूंचा यावेळी राज्य संघटनेकडून सत्कार करण्यात आला. उदय सामंत यांचा यावेळी राज्य संघटनेकडून सत्कार करण्यात आला. विश्वदास लोखंडे, शशांक घडशी, लक्ष्मण कररा , संजय सुर्वे, राम करा, प्रशांत मकवाना, शाहरुख शेख, मिलिंद भागवत यांनी यावेळी पाहुण्यांचा सत्कार केला. गणराज तायक्वांदो क्लब, रत्नागिरी तालुका तायक्वांदो अकॅडमी वतीने यावेळी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय तायक्वांदो संघटनेच्या राष्ट्रीय जूनियर तायक्वांदो स्पर्धा शिमोगा, कर्नाटका येथे ७ ते ९ जुलै २०२३ दरम्यान होणार असून या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड या राज्यस्तरीय स्पर्धेमधून होत आहे.
वजन गटनिहाय सुवर्णपदक विजेते खेळाडू-
आदित्य मनगटे (औरंगाबाद), ओम बोरसे (पुणे), अश्वत जाधव (पुणे), श्रेयश गवारी (पुणे), आर्यन भिलारे (पुणे), नयन बारगजे (बीड), स्नेहा वाघमारे (कोल्हापूर), सिद्धी बेंडळे (पुणे), श्रावणी भिंगारे (पुणे), श्रेया चव्हाण (पुणे)
पूमसे- सुवर्णपदक विजेते खेळाडू-
वैयक्तिक मुले - आर्यन येवले (मुंबई उपनगर)
वैयक्तिक मुली- सृष्टी करमळकर (ठाणे)
जोडी/पियर - यरआरोन लोबो व
सृष्टी करमळकर (ठाणे)
मुले सांघिक - आर्यन येवले, कार्तिक निकम,मयुरेश निकम (मुंबई उपनगर)
मुली सांघिक - आदिती सिंग, प्राची प्रजापती व हर्षिनी सोलंकी (पालघर)
Tags
क्रीडा