संत वामनभाऊ महाराज यांच्या सप्ताहाची जमादारवाडीत बुधवारी सांगता
जामखेड प्रतिनिधी : जामखेड शहरालगत असलेल्या जमादारवाडी येथील श्री संत वामनभाऊ गड या ठिकाणी सूरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात आज (मंगळवारी) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे अध्यापक ह.भ.प. परमेश्वर महाराज जायभाये यांचे कीर्तन होईल. तर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने उद्या बुधवारी सप्ताहाची सांगता होईल.
संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षापासून जमादारवाडी येथे भव्य सप्ताहाचे आयोजन केले जाते. श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे ज्या वेळेला पुष्पवृष्टी केली जाते त्याच दिवशी जमादारवाडी ठिकाणी सप्ताहाचा आरंभ होतो. त्याप्रमाणे बुधवार दि. २२ जानेवारी पासून येथे सप्ताहास प्रारंभ झाला.
यावेळी प्रारंभी राजाभाऊ महाराज कुलकर्णी यांचे प्रवचन झाले बुधवारपासून अनुक्रमे दत्तात्रय महाराज खवळे सारोळा यांचे कीर्तन नारायण महाराज काळे यांचे प्रवचन, शिवानंद महाराज श्रीक्षेत्र हनुमान टेकडी यांचे कीर्तन अंगद महाराज ढोले यांचे प्रवचन, शिवचरित्रकार गणेश महाराज बर्डे बोधेगाव यांचे कीर्तन, अर्जुन महाराज नेटके यांचे प्रवचन तर योगीराज महाराज पवार शास्त्री तिळापूर यांचे कीर्तन, दत्तात्रय महाराज डुचे यांचे प्रवचन व शिवचरित्रकार अशोक महाराज आजबे बीड यांचे कीर्तन मच्छिंद्र महाराज राऊत यांचे प्रवचन तर स्वामी शांतानंद सरस्वती महाराज पंढरपूर यांचे कीर्तन झाले.
आज मंगळवार दिनांक २८ जाने रोजी दुपारी चार ते सहा दिंडी प्रदक्षिणा होइल व सायंकाळी ७ ते ९ या वेळेत सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे अध्यापक ह.भ.प. परमेश्वर महाराज जायभाये यांचे कीर्तन होईल.
बुधवार दिनांक २९ जानेवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री. विठ्ठल महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर सार्वजनिक महाप्रसादाने संपूर्ण उत्सवाची सांगता होईल.
तरी या कार्यक्रमाचा तालुक्यातील भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संत वामनभाऊ गड सप्ताह समिती व जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.