सविस्तर असे की, राज्यातील विषय शिक्षक पदवीधर शिक्षक यांच्या वेतनश्रेणीबाबत 2014 पासून राज्यातील 40 हजार शिक्षक लढा देत आहेत. सर्व शिक्षक आमदार व पदवीधर आमदारांना भेटून आपली व्यथा हे शिक्षक मांडत आहेत. नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांचेशी विषय शिक्षक वेतनश्रेणी बाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी मंगेश गद्धेवार,प्रसाद श्रीरामे,आर.आर. अग्गुवार,आर. डी. अग्गूवार,दिलीप पदा,जितेंद्र रायपुरे. उपस्थित होते.
यापूर्वी आमदार कपिल पाटील व इतर आमदारांच्या माध्यमातून विधान परिषदेत याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित झालेले आहेत. तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे व त्यानंतर वर्षाताई गायकवाड यांच्याशी सुद्धा पदवीधर वेतनश्रेणीबाबत चर्चा झालेली आहे. सद्यस्थितीत शासनाने वेतनश्रेणी देणेबाबत अभ्यास गटाची स्थापना केली असून त्यासाठी तीन महिन्याचा अवधी निश्चित केलेला होता. मात्र सहा महिने उलटून गेले तरीही अद्याप त्यावर कोणताही निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यभरातील पदवीधर शिक्षकांमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे.
नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री व शिक्षण आयुक्त यांच्याकडे प्राथमिक पदवीधर वेतनश्रेणी संघर्ष समितीच्या माध्यमातून मुख्य समन्वयक देवेंद्र बारगजे व राज्य समन्वयक संजय लोणारे यांच्या माध्यमातून निवेदने पाठवण्यात आलेली आहेत. प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा राज्यातील सर्व पदवीधर विषय शिक्षकांना सहशिक्षक म्हणून पदावनत करावे अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे.
Tags
राजकीय