श्रीनागेश्वर सप्ताहात आज आत्माराम महाराज कुटे यांचे कीर्तन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
" श्री नागेश्वर अर्थात भगवान शंकर हाच सर्वात मोठा दाता आहे. भगवान श्रीनागेश्वराचा पालखी उत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू करुन यात्रेत भक्तांना धार्मिक उत्सवात सहभागी होण्याची संधी दिली त्यामुळे हा उत्सव उत्सव सुरू करणारे श्रीनागेश्वर मंडळ यांचे करावया तितके कौतुक कमी आहे"असे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांनी केले.
श्री नागेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त जामखेडचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. महेश विष्णू पाटील व सौ आशा महेश पाटील यांच्या हस्ते सकाळी साडे आठ वाजता श्रीनागेश्वराची विधिवत पूजा होईल. सकाळी नऊ वाजल्यापासून पालखी मिरवणूक सुरुवात होईल. त्याचप्रमाणे आज रविवारी सायंकाळी सात वाजता सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आत्माराम महाराज कुटे यांचे कीर्तन होईल.
श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त श्रीनागेश्वर पालखी सोहळा, शिवलीलामृत पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे श्रीनागेश्वर सेवा मंडळ व सप्ताह समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये रविवारी मनोहर महाराज इनामदार यांचे प्रवचन झाले. सायंकाळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांचे कीर्तन झाले. त्यावेळी कीर्तनातून त्यांनी वरील विचार मांडले. समितीच्या वतीने संत सेवेचे यजमान जामखेडचे सुप्रसिद्ध उद्योजक रमेश अजबे यांनी महाराजांचे स्वागत केले.
दाता तोची एक जाणा |
नारायणा स्मरावी ||
जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगावर चिंतन करत असताना श्री बोधले महाराज अतिशय सोप्या भाषेत कीर्तनातून आपले विचार मांडले. ते म्हणाले "या जगात असा कोणीच नाही की जो कोणाकडे तरी काही मागत नाही. तो लहान असो अथवा थोर असो. तो आयुष्यभर काहीतरी मागतच राहतो परंतु मागावे तरी कोणाकडे आणि काय मागावे हे भक्ताला कळाले पाहिजे. जो देण्यास समर्थ आहे त्याला मागावे तो ईश्वर देण्यास समर्थ आहे. आपण ज्यांच्या प्रांगणात बसलेलो आहोत तो भगवान नागेश्वर देण्यास समर्थ आहे. त्यामुळे दाता 'तोचि एक' हा दाता सर्वात श्रेष्ठ आहे आपल्याला आज जे वारकरी संप्रदायाला ज्ञान प्राप्त झाले ते भगवान शंकरापासूनच. म्हणजेच भगवान शंकराच्या व पार्वती मातेच्या संभाषणातून पुढे मच्छिंद्रनाथाकडे हे ज्ञान आले.
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा |
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ||
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला |
गोरक्ष वोळला गहिनीप्रती ||
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार |
ज्ञानदेवा सार चोजविले ||
या अभंगाचे प्रमाण देऊन यावेळी महाराजांनी अतिशय सोप्या भाषेत वारकरी संप्रदायाची परंपरा सांगितली. भगवान शंकरापासून क्रमाक्रमाने हे ज्ञान ज्ञानेश्वर माऊली पर्यंत पोहोचले व ज्ञानेश्वर माऊलींनी पुढे वारकरी संप्रदायाला हे ज्ञान सर्वांसाठी खुले करून दिले. असे बोलले महाराज म्हणाले
जामखेडच्या उत्सवावर बोलत असताना बोधले महाराज म्हणाले पूर्वी जामखेडची नागपंचमी कशी व्हायची सर्वांना माहित आहे. परंतु काही मोजक्या लोकांनी पुढे येऊन वीस वर्षांपूर्वी श्री नागेश्वर पालखी सोहळ्याची सुरुवात केली. त्यामुळे धार्मिक वृत्तीच्या लोकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. व यात्रेला एक धार्मिक वळण लागले. श्री नागेश्वर सेवा मंडळाने व सप्ताह समितीने ही तुम्हा जामखेडकरांना एक फार मोठी संधी दिली आहे. यात्रेच्या दिवशी श्री नागेश्वराला या, देवाचे दर्शन करा,व पालखी सोहळ्यात सहभागी व्हा. हा दाता म्हणजेच श्री नागेश्वर देण्यास समर्थ आहे. तुम्हा सर्वांना तो भरभरून देईल. अशी ग्वाही देऊन बोधले महाराज यांनी जामखेडचे चोपदार वैकुंठवासी मनोहर राजगुरू यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी जामखेड पंचक्रोशीच्या वतीने प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी श्रद्धांजली अर्पण केली. व भजनी मंडळाने राम कृष्ण हरी भजन करून चोपदार राजगुरू यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी कीर्तनाला मोठी गर्दी झाली होती.
शेवटी महाप्रसादाचे यजमान काजल जाधव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. व नंतर प्रसादाची पंगत झाली त्यावेळी भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.
आज श्रीनागेश्वर पालखी सोहळा
सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी पालखी मिरवणूक होईल. पालखी सोहळ्याचे महापूजेचे यजमान रावगाव ता.करमाळा जि. सोलापूर येथील मूळ रहिवासी तथ जामखेडचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. महेश विष्णू पाटील व सौ आशा महेश पाटील यांच्या हस्ते सकाळी साडे आठ वाजता श्रीनागेश्वराची विधिवत पूजा होईल. नऊ वाजता पालखीमध्ये श्रीनागेश्वराचा मुखवटा ठेऊन ही पालखी रथात ठेवली जाईल. टाळ मृदुंगाच्या गजरात हरहर महादेवाच्या जयघोषात मिरवणुकीस सुरुवात होईल.
श्रीनागेश्वर पालखी मार्ग
श्रीनागेश्वर मंदिरापासून पालखी मिरवणूक सुरू होईल श्रीनागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, लक्ष्मी चौक, संविधान चौक, श्रीविठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, जुने कोर्ट, महादेव गल्लीमार्गे ही दिंडी नव्याने झालेल्या वैतरणा नदीतील रस्त्याने श्रीनागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचेल.
आमदार रोहित पवार यांच्या हस्ते आरती
सुमारे दुपारी १२.३० नंतर पालखी मिरवणूक मंदिरापर्यंत पोहोचेल त्यानंतर कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते मिरवणुकीची सांगता आरती होईल. त्यानंतर बबलू देशमुख संजीवन मेंडकर, जवाहर कांतीलाल बेदमुथा, हरीश सायकल मार्ट, संजय टेकाळे, जमादारवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने दुपारचा महाप्रसाद होईल. दरम्यान, दिंडोरी प्रणीत श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी मंदिरासमोर होमहवन करतील.
दुपारी साडेचार ते साडेपाच दरम्यान राजेंद्र महाराज कुलकर्णी सारोळा, यांचे प्रवचन होईल व सायंकाळी सात ते नऊ या वेळेत सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक ह. भ. प. श्री. आत्माराम महाराज कुटे किर्तन होईल. सोमवारच्या संत सेवेचे यजमान सौ मंगलताई जोरे असतील. तर कीर्तनानंतरच्या महाप्रसादाचे यजमान पन्हाळकर एक्सीडेंट हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुशील विष्णुपंत पन्हाळकर यांच्या वतीने सर्व भक्तांकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहातील किर्तने
१६ ऑगस्ट ज्ञानेश्वरी महाराज बोराटे जामखेड
१७ ऑगस्ट कैलास महाराज भोरे देवदैठण
१८ ऑगस्ट हरी महाराज खुणे पाथरुड
१९ ऑगस्ट अजिनाथ महाराज निकम शेवगाव
२० ऑगस्ट अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले
२१ ऑगस्ट सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आत्माराम महाराज कुटे
२२ ऑगस्ट सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक परमेश्वर महाराज जायभाये,
२३ ऑगस्टला रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. व शेवटी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.
या संपूर्ण उत्सवासाठी श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, मिलिंद ब्रम्हे, विनायक राऊत, सिताराम राळेभात, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, संतोष बारगजे, दिलीप कुमार राजगुरू, पांडुरंग भोसले, महादेव पानसाडे, बबन सुर्यवंशी, किरण सोनवणे,नंदू शिंदे, प्रशांत काळे, सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे, ओम गुरव, श्री नागेश्वर भजनी मंडळाचे जगन्नाथ महाराज धर्माधिकारी(मेजर),शेषेराव मुरूमकर, त्र्यंबक वराट, मुरलीधर काळे, गिरधारीलाल ओझा, संतोष राळेभात पाटील अहोरात्र अथक परिश्रम घेत आहेत.