जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त सोमवारी सकाळी श्रीनागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त यजमान म्हणून जामखेडचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा होईल व ठीक नऊ वाजता टाळ मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक सुरू होईल. अशी माहिती श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे यांनी दिली.
जामखेड -खर्डा रस्त्यावर वैतरणा नदीतीरावर श्रीनागेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. शके११४४ मध्ये या मंदिराचे बांधकाम झाले असल्याचा उल्लेख येथे आहे.त्या काळातील शास्त्रयुक्तपद्धतीने केलेले दगडी काम आजही सुस्थितीत आहे. उत्तराभिमुख असलेल्या मंदिरातील गाभाऱ्यात काळी पाषाणाची पिंड आहे. पिंडीवर भगवान शंकराचा मुखवटा व नागाचा फडा आहे. समोर नंदी व पितळी भव्य त्रिशूळ आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला औदुंबर व उजव्या बाजूला पुरातन काळातील काही साधूंच्या समाधी आहेत.
श्रावण शुद्ध पंचमीला (नागपंचमी) या ग्रामदेवतेची यात्रा असते. या उत्सवाच्या निमित्ताने येथे सद्गुरु संत वामनभाऊ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने १६ ऑगस्ट पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ७ ते ९ वा. कीर्तन व नंतर आलेल्या सर्व भक्तांना भोजन असा भव्य कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे.
श्रीनागेश्वर पालखी सोहळा
सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी पालखी मिरवणूक होईल. पालखी सोहळ्याचे महापूजेचे यजमान रावगाव ता.करमाळा जि. सोलापूर येथील मूळ रहिवासी तथ जामखेडचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. महेश विष्णू पाटील व सौ आशा महेश पाटील यांच्या हस्ते सकाळी 9 वा. वाजता श्रीनागेश्वराची विधिवत पूजा होईल साडेनऊ वाजता पालखीमध्ये श्रीनागेश्वराचा मुखवटा ठेऊन ही पालखी रथात ठेवली जाईल. टाळ मृदुंगाच्या गजरात हरहर महादेवाच्या जयघोषात मिरवणुकीस सुरुवात होईल.
श्रीनागेश्वर पालखी मार्ग
श्रीनागेश्वर मंदिरापासून पालखी मिरवणूक सुरू होईल श्रीनागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, लक्ष्मी चौक, संविधान चौक, श्रीविठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, जुने कोर्ट, महादेव गल्लीमार्गे ही दिंडी नव्याने झालेल्या वैतरणा नदीतील रस्त्याने श्रीनागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचेल.
आमदार रोहित पवार यांच्या हस्ते आरती
सुमारे दुपारी १२.३० नंतर पालखी मिरवणूक मंदिरापर्यंत पोहोचेल त्यानंतर कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते मिरवणुकीची सांगता आरती होईल. त्यानंतर बबलू देशमुख संजीवन मेंडकर, जवाहर कांतीलाल बेदमुथा, हरीश सायकल मार्ट, संजय टेकाळे, जमादारवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने दुपारचा महाप्रसाद होईल. दरम्यान, दिंडोरी प्रणीत श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी मंदिरासमोर होमहवन करतील.
दुपारी साडेचार ते साडेपाच दरम्यान राजेंद्र महाराज कुलकर्णी सारोळा, यांचे प्रवचन होईल व सायंकाळी सात ते नऊ या वेळेत सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक ह. भ. प. श्री. आत्माराम महाराज कुटे किर्तन होईल. सोमवारच्या संत सेवेचे यजमान सौ मंगलताई जोरे असतील. तर कीर्तनानंतरच्या महाप्रसादाचे यजमान पन्हाळकर एक्सीडेंट हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुशील विष्णुपंत पन्हाळकर यांच्या वतीने सर्व भक्तांकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहातील किर्तने
१६ ऑगस्ट ज्ञानेश्वरी महाराज बोराटे जामखेड
१७ ऑगस्ट कैलास महाराज भोरे देवदैठण
१८ ऑगस्ट हरी महाराज खुणे पाथरुड
१९ ऑगस्ट अजिनाथ महाराज निकम शेवगाव
२० ऑगस्ट अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले
२१ ऑगस्ट सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आत्माराम महाराज कुटे
२२ ऑगस्ट सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक परमेश्वर महाराज जायभाये,
२३ ऑगस्टला रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. व शेवटी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.