उपचारादरम्यान संदेश कोठारी यांचा मृत्यू जामखेड तालुक्यात हळहळ


जामखेड प्रतिनिधी 
जामखेडचे माजी सरपंच सुनिल कोठारी यांचे चिरंजीव संदेश कोठारी यांचा संभाजीनगर येथे शनिवारी उपचारादरम्यान तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. 

गुरुवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री चारचाकी गाडीने ( एम.एच. १६ सी.व्ही. २२७७) संदेश कोठारी यांच्यासह चौघे जण जळगाव येथून जामखेडकडे येत होते. हिंगोणे (ता. चाळीसगाव ) जवळील वळणावर अचानक आलेल्या खराब रस्त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने गाडी उलटून झाडावर आदळली. गाडी झाडात अडकल्याने यातील प्रवाशांना बाहेर काढता येत नव्हते. दरम्यान, खासदार उन्मेष पाटील चाळीसगावकडे जात असताना ते घटनास्थळी थांबले. व त्यांनी चाळीसगाव येथून तत्काळ रुग्णवाहिका व कटर मागविले. व गाडी कापून जखमी प्रवाशांना बाहेर काढले होते.

या अपघातात अरुण मोरे (४५, रा. घोगरगाव,) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर संदेश सुनील कोठारी (३९), रसिकलाल मोहनलाल बोथरा (४५), सुजित सुनील अवसरकर (३७, तिघे रा. जामखेड यांच्यावर चाळीसगावला खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर संदेश कोठारी यांना संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे शनिवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. 

या दुर्दैवी घटनेमुळे कोठारी परिवारावर शोककळा पसरली आहे. जामखेड तालुक्यात व परिसरात या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 संदेश कोठारी यांचे वडील सुनील कोठारी यांच्या सामाजिक कामामुळे अनेकांचे संसार उभे राहिले आहेत. तर चुलते सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आजपर्यंत शेकडो अपघातग्रस्तांना वेळीच मदत करून अनेकांचे प्राण वाचविले. मात्र त्यांच्याच कुटुंबातील एक तरुणाचा अपघाताने असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे
  

Post a Comment

Previous Post Next Post