निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने व PLIZ India Pvt. Ltd. कंपनीच्या सामाजिक सेवा निधी (CSR) निधीतून पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागात खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या व घरापासून शाळेचं अंतर दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेत येण्या-जाण्याचा प्रवास सुखकर व्हावा व शिक्षणाप्रती त्यांच्या मनामध्ये गोडी निर्माण व्हावी हा उदात्त हेतू ठेवून निरंजन सेवाभावी संस्थेने अशा १५० विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करुन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. कात्रज, पुणे या ठिकाणी ॲस्टोन प्लाझा या इमारतीच्या सभागृहात पिल्झ इंडिया कंपनीच्या CEO Susanne Renate Kunschert Pilz (जर्मनी) Moya Daniel, James Large, निरंजन सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.जयेश कासट, पिल्झ इंडिया लीमिटेडचे संजय कुलकर्णी व इतर मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवस्ती, ता.जामखेड, जि.अहमदनगर या शाळेतील इयत्ता चौथी व पाचवीच्या वर्गातील १० गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले.
धनगरवस्ती शाळेच्या चिमुकल्यांनी जर्मनीच्या पाहुण्यांचे पारंपरिक लेझीम नृत्य सादर करून आगळ्यावेगळ्या ढंगात स्वागत केले. चिमुकल्यांचा आनंद व उत्साह पाहून परदेशी पाहुण्यांनीही लेझीमच्या चालीवर ठेका धरला. पाहुण्यांच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळी काढली होती.
निरंजन सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.जयेश भाऊ कासट, CA श्री.विशाल राठी, श्री.अतुलजी डागा, पत्रकार सतीश मुरकुटे (शिरूर कासार) व निरंजनचे सर्व पदाधिकारी यांच्यामुळे ही मदत धनगरवस्ती शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मिळाली आहे.
निरंजन सेवाभावी संस्था सातत्याने सामाजिक कार्य करत आहे. समाजामध्ये मायेची, प्रेमाची, आपुलकीची आणि माणुसकीची फुंकर घालण्याचं काम ही संस्था सातत्याने करत आहे. अनेक उपक्रम नियमितपणे निरंजन मार्फत राबवले जातात. अनाथ व गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व, विधवा व निराधार महिलांना आटा चक्की वाटप, शिलाई मशीनचे वाटप, गरजूंना सायकल वाटप तसेच इतरही अनेक उपक्रम सातत्याने राबवले जातात. संस्थेचा मुख्य हेतू विद्यार्थी, शाळा विकास, महिला सबलीकरण व नेतृत्व विकास हा आहे. पूणे, अहमदनगर व बीड या तीन जिल्ह्यांमध्ये या संस्थेचे कार्य चालू आहे. पाथर्डी तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा हनुमाननगर (भारजवाडी) या शाळेला डिजिटल वर्ग खोली व सोलर विद्युत यंत्रणा निरंजन सेवाभावी संस्थेने प्रदान केली होती. समाज उभारणीत व बांधणीत निरंजन सेवाभावी संस्था मोलाचा वाटा उचलत आहे.
तालुक्याच्या बाहेर कधीही न गेलेली मुलं ज्यावेळी पुणे शहर पाहत होती, त्यावेळी प्रत्येक गोष्टीकडे कुतुहलाने व आश्चर्याने पाहत होती. उंचच उंच इमारती, गाड्या, रस्ते, कारखाने, गर्दी, ट्रॅफिक, फ्लाय ओव्हर, विमान अशा एक ना अनेक गोष्टी कौतुकाने एकमेकांना दाखवत होती आणि किलबिलाट करत होती. त्यांचा आनंद खर खूप सुखावणारा होता. धनगरवस्ती शाळा हळूहळू प्रगती करत आहे. लोकसभागातून शाळेचा कायापालट होत आहे.
सायकल वितरण कार्यक्रमाला मुले घेऊन जाण्याची परवानगी पंचायत समिती जामखेडचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी *श्री.प्रकाश पोळ साहेब, कार्यतत्पर गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे साहेब, विस्ताराधिकारी तथा केंद्रप्रमुख श्री.केशव गायकवाड साहेब व प्रशासनाने देवून उपक्रमाचे कौतुक केल्याबद्दल सर्व अधिकारी महोदयांचे धनगरवस्ती शाळेच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद.
शाळा व्यवस्थापन समितीनेही उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थी घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांसमवेत शा.व्य.समितीचे अध्यक्ष श्री.पांडुरंग धेंडे, पालक श्री.महादेव घुमरे, श्री.योगेश चिलगर, श्री.शरद घुमरे, श्री.पप्पाजी थोरात, श्री.शिवनाथ महारनवर यांनी सोबत येऊन विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घेतली. धनगरवस्ती शाळेच्या सर्वच पालकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. सायकल भेटल्यामुळे चिमुकले व पालक अगदी आनंदून गेले.
शाळा उभी राहत असताना शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री.जालिंदर चिलगर सर उत्कृष्ट नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळेच सर्व काही शक्य होत आहे. सर्व पालकांचे, अधिकाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे व निरंजन सेवाभावी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे
मुख्याध्यापक श्री.जालिंदर चिलगर सर यांनी आभार व्यक्त केले.
लेख *श्री.लहू बोराटे.*
९७६३८४१५३०