विसाव्या शतकातील महान साक्षात्कारी संत वामनभाऊ महाराज



आज पौष कृ.सप्तमी ,अष्टमी म्हणजेच बीड जिल्ह्यातील वैराग्यमूर्ती व विसाव्या शतकातील महान साक्षात्कारी संत वामनभाऊ महाराज यांची ४८ वी  पुण्यतिथी . आज श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे लाखो भाविकांची गर्दी होते . श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गड व आठेगाव परिसर सज्ज आहे.आज गडावर या परिसरातील ठीकाठीकांच्या दिंड्या दाखल होतील सायंकाळी जागर हरिकीर्तन होईल उद्या पाहटे श्री गहिनीनाथ महाराज व संत वामनभाऊ महाराज यांचा अभिषेक होईल नंतर ९ते ११ . ४५ वा हरी कीर्तन पुष्पवृष्टी होईल व महाप्रसाद होईल

या निमित्ताने हा विशेष लेख ....


महाराष्ट्र ही संतांची भूमी .संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत सावता महाराज संत गोरोबा काकांपासून ते जगदगुरू संत तुकाराम महाराज या थोर संतांची परंपरा महाराष्ट्राला लाभली.विविध जातीधर्मातून अज्ञानी लोकांना योग्य मार्गदर्शन करून या संतांनी भक्तीमार्ग दाखवला.
विसाव्या शतकामध्ये बीड जिल्ह्यात संत बंकट स्वामी ,संत वामनभाऊ महाराज,संत भगवानबाबा, संत ज्ञानेश्वर माऊली (चाकरवाडी ) या थोर साधूंनी भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली.

पवित्र ते कुळ पावन तो देश !
जेथे हरीचे दास जन्म घेती !!

फुलसांगवी, ता.शिरूर (कासार),जि.बीड येथील तोलाजी ग्यानबा सोनावणे व बोरगाव (चकला) ता.गेवराई जि.बीड चे विठोबा राख यांच्या कन्या राहीबाई यांचा विवाह झाला. वंजारी समाजातील या पुण्यवान माता-पित्याच्या पोटी सदगुरू संत वामनभाऊ महाराज यांनीं जन्म घेतला. त्यांना जेष्ठबंधू नारायन हे होते.

माता राहीबाई या जुन्या प्रथेप्रमाणे बाळंतपणासाठी माहेरी बोरगावला गेल्या होत्या. सन.१८९१ साली श्रावण शुद्ध सोमवारी सूर्योदय समई त्यांनी या रत्नाला जन्म दिला. नाव ठेवले, वामन.

माता राहीबाई भाग्याची खाण ।
पिता तोलाजी हा पुण्यवान ।।
पुत्र जन्माला रत्नासमान ।
तयासी शोभे नाव वामन ॥

'भाऊ' हे भगवान शंकराचा अवतार मानले जातात. माता राहीबाई यांच्या पोटी प्रत्यक्ष देवाने जन्म घेतला. हे त्याचे भाग्य थोर असले तरी.नियतीला काही वेगळेच घडवायचे होते. भाऊंचे संगोपन त्या माउलीच्या नशिबी नव्हते. भाऊंच्या जन्मानंतर अवघ्या ४० दिवसानंतर माता राहीबाई यांना देवाज्ञा झाली. मातेचे प्रेम या बाळाला मिळाले नाही.
पूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बाळाचे संगोपन कसे करायचे हा प्रश्न त्यंच्या पुढे उभा होता. राहीबाईने त्यांची आई आबाबाई यांना दृष्टांत दिला व सांगितले 'आई आता तूच माझ्या बाळाची आई हो. तूच माझ्या वामनचा सांभाळ कर.' आबाबाई सकाळी झोपेतून उठल्या त्यांनी बाळाला जवळ घेतले आणि चमत्कार झाला. नातवासाठी आजीला पान्हा फुटला. या आजीनेच भाऊंना लहानचे मोठे केले.

बालपणापासूनच त्यांना भक्तिमार्गाची आवड होती.शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी नेकनूरचे संत बंकटस्वामी यांना गुरु करून घेतले .स्वामींनी दिलेला "रामकृष्ण हरी " हा वारकरी साम्प्रदायाचा  मंत्र जपत जपत भाऊंनी आळंदी येथे सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून आपले शिक्षण पूर्ण केले .पहाडी आवाज,  गायनशैली उत्तम असल्याने भाऊंचे कीर्तन प्रवचन लोकांना आवडू लागले.नंतर भाऊ पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथे बरेच वर्षे राहिले .तेथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर भाऊ एकादशीला गेले असताना तेथे संत यादवबाबा होते.त्यांनी भाऊंना रात्रीचे कीर्तन करण्याचा आग्रह केला. भाऊंनी तेथे रात्रीचे कीर्तन केले.
तुम्ही संत मायबाप कृपावंत ||
काय मी पतित कीर्ती वानू ||
संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर भाऊंनी कीर्तन केले.कीर्तन ऐकून यादवबाबा खूप खुश झाले, त्यांनी वामनभाऊंना कडकडून मिठी मारली व म्हणाले "तू सामान्य नाहीस, या गडाची गादी तुलाच सांभाळायची आहे .या गडाचा तुझ्याच हाताने विकास होणार आहे ." नंतर भाऊंनी श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथेच राहण्याचा निर्णय घेतला .
भाऊंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गडाचा विकास केला.त्या काळात कसल्याही सुविधा नसताना पायी प्रवास करून डोंगरदर्‍यातील वाड्या वस्त्यांवर जाऊन कीर्तन प्रवचन करून अज्ञानी समाजाला प्रबोधन केले.अंधश्रद्धेतून बाहेर काढून त्यांना ज्ञानी बनविण्याचे काम केले.१९४५ साली डोईठाण ता.आष्टी येथून वार्षिक नारळी सप्ताहाची परंपरा सुरु केली.दरवर्षी फिरत्या सप्ताहामुळे गावोगावी भक्तिमार्गाचा प्रसार वाढेल ही त्यांची त्यामागची संकल्पना होती. भाऊंना वाचासिद्धी प्राप्त होती.त्यांच्या बोलण्याने काही विपरीत घडू नये म्हणून बरेच लोक त्यांच्या जवळ जायला घाबरायचे,परंतु ती आदरयुक्त भीती होती.भाऊंनी प्रसन्न होऊन ज्याला आशीर्वाद दिला  त्याचे जन्मोजन्मीचे कल्याण व्हायचे व एखाद्याला  शाप दिला तर ते आजही त्यातून मुक्त झाले नाहीत. असा जुन्या लोकांचा अनुभव आहे.  भाऊ स्वभावाने अतिशय कडक होते.  तसे तितकेच प्रेमळही होते असे जुने लोक सांगतात .ज्याप्रमाणे आपली आई कडवट शब्दांचा वापर करते परंतु त्यामागे तिचा हेतू असतो तो आपल्या बालकाने सुधारावे .चूक केल्यानंतर कधी रागावणे व कधी प्रेमाने जवळही घेणे हे जसे आईचे अंत:करण दर्शविते. अगदी तसेच भाऊंचे अंत:करण होते.

जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले ।
तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा ।।

या अभंगाला प्रमाण मानून संत वामनभाऊंनी संपूर्ण जीवन समाजासाठी झिजवले
पौष कृ. सप्तमी १९७६ साली भाऊंनी देह ठेवला. दर वर्षी पौष कृ. सप्तमी व अष्टमी या तिथीला संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा पुण्यतिथी उत्स्त्व साजरा केला जातो.

 लेख - संतोष बारगजे संपादक महाराष्ट्र न्यूज पोर्टल जामखेड

जमादारवाडी येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

Post a Comment

Previous Post Next Post