जामखेड प्रतिनिधी
शहरा लगत असणाऱ्या जांबवडी रस्त्यावर भीषण अपघात घडला आहे. या अपघातात बोलेरो वाहन रस्त्यावर पडलेल्या खडी मुळे नियंत्रण सुटून विहिरीत पडले. या दुर्दैवी घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
अशोक विठ्ठल शेळके वय 29 रा. जांबवाडी, रामहरी गंगाधर शेळके वय 35 रा. जांबवाडी, किशोर मोहन पवार वय 30 रा. जांबवाडी, चक्रपाणी सुनील बारस्कर वय 25 रा. राळेभात वस्ती असे चार तरूण मातकुळी कडून जांबवाडी मार्गी जामखेडकडे येत होते येत असताना रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खडी वरून गाडी गेल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बोलेरो गाडी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडली. या घटनेमुळे अपघातस्थळी एकच खळबळ उडाली.
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तत्काळ घटनास्थळी आपली रुग्णवाहिका घेऊन धाव घेतली. तेथील जमलेल्या नागरिकांनी तथा पोलिसांनी अपघातग्रस्तांना विहिरीतून बाहेर काढून कोठारी यांच्या रुग्णवाहिकेत टाकून उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. असे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी घोषित केले.
या घटनेने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. या दुर्घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी प्रशासनाकडे तक्रार करत रस्त्यांच्या कामासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील पुढील तपास करीत आहेत अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने रस्त्यांची वेळोवेळी देखभाल करणे आणि सुरक्षेचे उपाय योजणे आवश्यक आहे, असे कोठारींचे म्हणणे आहे. या कामी अनेकांच्या मदतीसह संजय कोठारी यांना महेंद्र क्षीरसागर, तन्वीर शेख आदींनी मदत केली.