‘TFI’ हाच राष्ट्रीय क्रीडा महासंघ, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय


महाराष्ट्र न्यूज 
भारतभर गेल्या अनेक दिवसांपासून तायक्वांदो खेळाचे कोणते फेडरेशन अधिकृत यावर मतभेद निर्माण झाले होते. खेळाडू ही संभ्रमात होते मात्र आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देशातील तायक्वांदो खेळाच्या फेडरेशनमधील वादावर पडदा पडला असून, तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया (टीएफआय) हीच राष्ट्रीय क्रीडा महासंघ असल्याचा ऐतिहासिक निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे ‘टीएफआय’ला भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

देशात गेल्या अनेक दिवसांपासून कोणते फेडरेशन अधिकृत आणि कोणते नाही, यावर अनेक पातळ्यांवर मतभेद निर्माण झाले होते. यामुळे अनेक राज्यातील काही खेळाडूंमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली होती. देशात तायक्वांदो खेळाच्या वाढत्या प्रचार आणि प्रसारामुळे काही अनधिकृत संघटनांनी यात फायदा घेत अनेक खेळाडूंना मोहित केले होते. मध्यंतरी ‘टीएफआय’ची निवडणूक झाल्यानंतर भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली होती. परंतु, गेल्या १८ मे २०२५ मध्ये अचानकपणे ‘टीएफआय’ला कोणतीही पूर्व सूचना न देता नियमबाह्य पद्धतीने इंडिया तायक्वांदोला (आयटी) मान्यता दिली होती. युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयाविरोधात ‘टीएफआय’ने खेळाडूंचे हित आणि आपल्या न्याय हक्कासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मंगळवारी (ता.१८) सुनावणी पूर्ण झाली असून, उच्च न्यायालयाने आदेश देत ‘टीएफआय’ला पूर्वीची मान्यता पुन्हा बहाल करण्यास युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयास सांगितले आहे आणि ‘टीएफआय’ हीच राष्ट्रीय क्रीडा महासंघ असल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे तायक्वांदो खेळातील राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन विषयी चित्र आता स्पष्ट झाले आहे. 
----------- 
क्रीडा मंत्रालयाला सुनावले 
दिल्ली उच्च न्यायालयाने भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाकडून इंडिया तायक्वांदोला (आयटी) दिलेल्या मान्यतेविरोधात निर्णय देत स्पष्ट नमूद केले की ‘आयटी’ ही युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता मिळविण्यास पात्र अशी फेडरेशन नाही. अशा प्रकारची मान्यता दिल्याबद्दल न्यायालयाने क्रीडा मंत्रालयाला कठोर शब्दांत सुनावले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post