महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बाजार तळ येथे दुर्गा माता मंदिराशेजारी असलेले जामखेड शहराच्या इतिहासातील सर्वात जुने व्यासपीठ गुरुवारी रात्रीच्या वादळी पावसामुळे उन्मळून पडले या व्यासपीठाने अनेक राष्ट्रीय नेत्यांना भाषण करताना सावली दिली होती.
जामखेडला ग्रामपंचायत असताना सुमारे 1990 च्या काळात विठ्ठलराव राळेभात सरपंच असताना त्या काळातले हे सर्वात मोठे व्यासपीठ निर्माण झाले होते. प्रशस्त असे बांधकाम केलेला ओटा व त्यावर भक्कम असे लोखंडी अँगलने छत तयार करण्यात आले होते. त्यावर सिमेंटचे पत्रे वापरण्यात आले होते. त्या काळातील हे सर्वात मोठे व भक्कम व्यासपीठ व समोर प्रशस्त मोकळे मैदान असल्याने येथे भाजप चे राष्ट्रीय नेते लालकृष्ण आडवाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाजपचे राष्ट्रीय नेते प्रमोद महाजन लोकनेते गोपीनाथ मुंडे या दिग्गज नेत्यांच्याही या व्यासपीठावर अनेक सभा झालेले आहेत. त्याचबरोबर इतरही अनेक नामवंत मोठ्या नेत्यांची भाषणे झालेली या व्यासपीठाने पाहिलेली आहेत. त्याचबरोबर इतर सांस्कृतिक कार्यक्रम देखील या व्यासपीठावर होत असतात. ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण म्हणून परिसरातील अनेक लोक या छताचा अनेक वर्ष आधार घेत असत. उन्हाळ्यात कायमस्वरूपी या छताखाली गर्दी असायची. माणसांबरोबरच मुके प्राणी देखील या छताचा आश्रय घेत असत. लोखंडी अँगल कुजल्याने कालच्या वादळी पावसामध्ये या व्यासपीठावरचे छत कोसळले. गुरुवारी रात्री जामखेडला अचानक पाऊस झाला या पावसादरम्यान रात्री आठच्या सुमारास वादळामध्ये हे सर्वात जुने असलेले व्यासपीठ उध्वस्त झाले. बाजार तळामध्ये हे स्टेज पडल्याचा आवाज येताच परिसरातील अनेक नागरिक या घटनेच्या दिशेने धाव घेत होते. छताखाली सुदैवाने कोणीही नव्हते म्हणून कसलीही जीवित हानी झाली नाही. परंतु अनेक राष्ट्रीय नेत्यांना सावली दिलेले व अनेक राजकीय सभा व सांस्कृतिक कार्यक्रम होत असलेले एक ऐतिहासिक व्यासपीठ मात्र नष्ट झाले.
Tags
जामखेड