कोल्हापूर:- कोल्हापूर येथील राव'ज अकॅडमी येथे झालेल्या मित्रत्वाच्या सामन्यात मुंबईच्या बँक ऑफ बडोदाने बांगला देशच्या राष्ट्रीय संघावर चुरशीच्या सामन्यात ३१-२८ अशी मात केली. एशियन कबड्डी स्पर्धेच्या पूर्व तयारी करिता बांगला देशचा राष्ट्रीय संघ कोल्हापूर येथील आंतर राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. रमेश भेंडिगिरी यांच्या राव'ज अकादमी मध्ये सरावा करिता आला आहे. स्थानिक संघां बरोबर झालेल्या पहिल्या तीन सराव सामन्यातील विजया नंतर त्यांचा हा पहिला पराभव.
बँकेने आक्रमक सुरुवात करीत पहिल्या डावात १७-११ अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या डावात मात्र बांगला देशने आपल्या खेळात सुधारणा करीत ही आघाडी कमी करीत आणली. पण अखेर अनुभवात कमी पडलेल्या बांगला देश संघाला ३गुणांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय प्रशिक्षक राजेश पाडावे यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या बँकेच्या संघाने बाजी मारली. संकेत मोरे, आदित्य गजमल, गणेश महाजन यांच्या चढाई - पकडीच्या संयमी व धूर्त खेळीला या विजयाचे श्रेय जाते. बांगला देशचा कर्णधार तोहिन, उपकर्णधार अजमल मुंशी आणि मियाउद्दीन यांनी दुसऱ्या डावात आपला खेळ उंचावित कडवी लढत दिली. पण संघाच्या विजयाकरिता ती कमी पडली. या सामन्याकरिता कोल्हापूर जिल्हा कबड्डी असो.चे पदाधिकारी अण्णासो गावडे, प्रा. चंद्रशेखर शहा, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त उमा रमेश भेंडीगिरी, ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव मालोजी भोसले, बँकेचे कबड्डी व्यवस्थापक पराग सुर्वे, अजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
क्रीडा