पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकावर आ. रोहित पवार यांनी केली हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, पवित्र नद्यांच्या जलाने अभिषेक, उज्जैन येथून आणलेल्या हत्तीची चौंडीमध्ये पूजा, २९८ व्या जयंतीनिमित्त २९८ शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी, सीना नदीपात्रात ४१ हजार पणत्यांपासून अहिल्यादेवींची यांची थ्रीडी प्रतिकृती साकारून आमदार रोहित पवार यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री बारा वाजता एक आगळावेगळा सोहळा साजरा केला.

जयंती साजरी करण्यास विरोध होत असताना आमदार रोहित पवार यांनी एक आगळावेगळा पायंडा सुरू केला आहे जयंतीच्या पूर्वसंध्येला काल रात्री चौंडी येथे क्षिप्रा, नर्मदा, गोदावरी, चंद्रभागा, रामेश्वर, तापी आणि कृष्णा या सात नद्यांचे जल आणि राज्याच्या विविध भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारवमधील कार्यकर्त्यांनी आणलेल्या पवित्र जलाने मतदारसंघातील जोडप्यांच्या हस्ते महापूजा आणि जलाभिषेक करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करुन अभिवादन करण्यात आले. 

 अहिल्यादेवी होळकर  यांची  २९८ वी जयंती असल्याने २९८ फटाक्यांची एक तास नेत्रदीपक आतषबाजी करुन राज्यभरातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास अभिवादन केलं. यावेळी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. जयंतीनिमित्त त्यांच्या कर्मभूमीतून उज्जैन येथून आणलेल्या हत्तीची चौंडीमध्ये पूजा करण्यात आली.

चौंडी येथील महादेवाचं मंदिर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकावर डोळ्यांचे पारणे फेडणारी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अशा प्रकारे पहिल्यांदाच रात्री १२ वाजता सर्वांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करता आली, याचं आमदार रोहित पवार यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

चौंडीतील सीना नदीपात्रात ४१ हजार पणत्यांपासून (५० बाय ५० साईझ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची थ्रीडी प्रतिकृती साकारून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीची अनोखी मानवंदना देण्यात आली. कलाकार उद्देश पघळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही प्रतिकृती साकारली

त्यानंतर श्रीक्षेत्र आळंदी येथील ह.भ.प. गडदे महाराज यांचे किर्तन झाले. याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला.राज्याच्या व देशाच्या विविध भागातून चौंडीमध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून करण्यात आली  आहे.

यापूर्वी जयंतीनिमित्त चोंडी येथे असे कार्यक्रम कधीही पाहायला मिळाले नव्हते आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून काही नवीन पाहायला मिळाले याचा आनंद येथील ग्रामस्थ व राज्यभरातून येणाऱ्या भाविकांमध्ये पाहायला मिळाला. 



Post a Comment

Previous Post Next Post