मिशन आपुलकी अंतर्गत तेलंगशी केंद्र शाळेस 21,500 रु.किमतीच्या मोफत वह्यांचे वाटप

हिंदुस्थान कॅटल फीडस् बारामती कंपनीचा स्तुत्य उपक्रम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क:
जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी ता.जामखेड या शाळेतील पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार वह्या व रजिस्टरचे नुकतेच वाटप करण्यात आले.मिशन आपुलकी अंतर्गत मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तेलंगशी गावचे शिक्षणप्रेमी असणारे युवा उद्योजक बप्पा ढाळे यांच्या पुढाकारातून हा शैक्षणिक साहित्य स्वरुपातील लोकसहभाग मिळाला.

शाळेला गावाचा अभिमान असावा...आणि गावाला शाळेचा..याच आपुलकीतून शिवनेरी दूध संकलन तेलंगशीचे चेअरमन बप्पा ढाळे यांनी हिंदुस्थान कॅटल फिडस् बारामती जि.पुणे या कंपनीच्या CSR फंडातून तब्बल 21,500 रु.किंमतीच्या दर्जेदार वह्या व रजिस्टर मिळवून त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाटप केले.

महागाईच्या काळात ग्रामीण भागातील शेतकरी व मजूर वर्गातील पालकांच्या पाल्यांना अशी शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.या कार्यक्रमास हिंदुस्थान कॅटल फिडस् बारामती तांञिक विस्तार अधिकारी डाॅ.परमेश्वर चव्हाण, सेल्स आॅफिसर युवराज कोळेकर व शाळेचे मुख्याध्यापक केशव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूञसंचलन विजयकुमार रेणुके तर आभार अनंता गायकवाड यांनी मानले.या उपक्रम यशस्वीतेसाठी संतोष गोरे,सुशेन चेंंटमपल्ले,अशोक जाधव,रविंद्र धस व मनोजकुमार दळवी यांनी परिश्रम घेतले.
 शाळेच्या या उपक्रमाचे गटविकासअधिकारी श्री.प्रकाश पोळ,गटशिक्षणाधिकारी श्री.बाळासाहेब धनवे,खर्डा बीटचे विस्तार अधिकारी श्री.सुनील जाधव ,तेलंगशी गावचे सरपंच श्री. कांतीलाल जाधव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.भागवत जायभाय,ग्रामस्थ व पालक यांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post