महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
"महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. आपण शांततेचे मार्गाने आंदोलन केले. कुठेही हिंसा करू नका. व तरुणांनो आत्महत्या करू नका. तुम्ही आत्महत्या केल्यावर आरक्षण कोणाला द्यायचे 14 ऑक्टोबरला अंतरवाली येथील सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहा सभेची गर्दी पाहूनच सरकारला आरक्षण द्यायला भाग पडले पाहिजे. "असे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जामखेड येथे शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. जामखेड तालुक्यात शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांचे सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चोंडी येथे आगमन झाले. तेथे त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. त्यानंतर सायंकाळी नऊ वाजता जामखेड येथे भव्य दिव्य सभा झाली यावेळी मनोज जरांगे पाटील बोलत होते.
जामखेड शहरात आगमन होताच मनोज जरांगे पाटील यांचे जेसीबीच्या सहाय्याने फूलांची उधळण करून तसेच मोठा हार घालून हलगीच्या सवाद्यात स्वागत करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयाजवळ त्यांनी झालेल्या सभेत त्यांनी मार्गदर्शन केले.
मनोज जरांगे पाटील आपल्या भाषणात म्हणाले, "की सरकारने आपल्याला एक महिना मुदत मागितली होती. आपण त्यांना दहा दिवस वाढवून दिले आहेत. 14 तारखेला एक महिना पूर्ण होत आहे. व 24 ऑक्टोबरला 40 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे आता सरकारची व समितीची पळापळ सुरू झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. मी जिवंत असेपर्यंत बदलणार नाही. व समाजाची गद्दारी करणार नाही. सरकारने कितीही डाव टाकले तरी इंचभर सुद्धा मागे सरकणार नाही. कारण मी तुमच्यातला पोरगा आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मागे सरकणार नाही. असे म्हणून त्यांनी अंतरवली येथे होणाऱ्या 14 तारखेच्या सभेला जामखेड तालुक्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले अंतरवालीला एवढ्या मोठ्या संख्येने समाज एकत्र आला पाहिजे की तेथील समाज पाहूनच सरकारला सह्या करण्यास भाग पडले पाहिजे. अंतरवाली आल्यानंतर सर्वांनी नियम पाळायचे असेही त्यांनी सांगितले ते म्हणाले
आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे. कुठेही उद्रेक करू नये. जाळपोळ करू नये. व सर्वात महत्त्वाचे आरक्षणासाठी तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. जर मराठ्यांची पोर मेले तर आरक्षण कुणासाठी मिळवायचे?
सरकार आरक्षण देणार आणि मराठेही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणारच नाही. मी तुमच्यातला आहे. मराठा समाजाच्या शब्दापुढे जाणार नाही आणि मरेपर्यंत गद्दारी करणार नाही.
यावेळी जामखेड तालुक्यातील व पंचक्रोशीतील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षातील नेते व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. जामखेड शहरातील सर्व रस्त्यावर मनोज जरंगे पाटील यांच्या स्वागताचा कमानी व डिजिटल बॅनर लागले होते.