रत्नदीप कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नियुक्त नोडल ऑफिसर जोत्स्ना बुधगावकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात उद्या बेमुदत रास्तारोको

 महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : जामखेड तालुक्यातील रत्नापूर शिवारातील रत्नदीप मेडिकल फौंडेशनच्या रत्नदीप मेडिकल कॉलेजमधील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थ्यिनींचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन या सरकारी संस्थेच्या नोडल ऑफिसर जोत्स्ना बुधगावकर या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्या ऐवजी रत्नदीप कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे व संचालकांशी संगनमत करून विद्यार्थ्यांची अडवणूक करत असल्याचा आरोप करत. मनमानी पद्धतीने मुलांशी वागत असल्याने त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात जामखेड तालुका शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सकल मराठा या संघटनांसह विविध पक्षसंघटना, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी उद्या दि. ३०/०३/२०२४ रोजी सकाळी १० वाजले पासून बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या बाबत तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांना अंदोलनाचे रितसर निवेदन देण्यात आले आहे. काल दि. २८ मार्च रोजी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अँड पॅरामेडिकल एज्युकेशन या सरकारी संस्थेने नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे रत्नदीप मेडिकल काॅलेज व विद्यापीठ स्तरावरील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून जोत्स्ना बुधगावकर यांची नेमणूक केली होती. मात्र त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी संस्थेशी आर्थिक तोडजोडी केल्याचा संशय आहे व त्या जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांची पिळवणूक करत आहेत. असे आरोप अंदोलक संघटना व विद्यार्थ्यांनी केले असून त्या मनमानी कारभार करत असल्याने जोत्स्ना बुधगावकर यांची नोडल ऑफिसर पदाची नियुक्ती रद्द करून दुसऱ्या न्याय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. अन्यथा उद्या दिनांक ३०/०३/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून जामखेड येथील खर्डा चौकामध्ये सर्व विद्यार्थी व जामखेड मधील नागरिक सामुदायिक रित्या बेमुदत रस्ता रोको आंदोलन करणार आहेत. यावेळी काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास जोत्स्ना बुधगावकर यांना जबाबदार धरण्यात यावे असा इशारा या निवेदनाव्दारे दिली आहे. 
यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे अध्यक्ष पांडूराजे भोसले, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, सामाजिक कार्यकर्ते केदार रसाळ, धारकरी व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post