जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 'शिवलीलामृत' पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी पारायणाची सुरुवात झाली. यामध्ये वाचकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला श्रीनागेश्वर पालखी सोहळा शुक्रवारी सकाळी होणार आहे.
व्यासपीठ चालक ह. भ. प. पंढरीनाथ महाराज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 200 वाचक वाचकांनी या वेळेला पारायण सोहळ्यात सहभाग नोंदविला आहे. यामध्ये महिलांचा सहभाग मोठा आहे. दररोज सकाळी आठ ते दहा या वेळेत शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन केले जाते. दररोज सकाळी ग्रंथ पूजन, १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्र जप,नंतर जगद्गुरु तुकोबाराय यांचा तुम्ही विश्वनाथ अभंग गायला जातो , नंतर अध्याय वाचन व शेवटी महादेवाच्या आरतीने रोजच्या पारायणाची सांगत होते. यामुळे मंदिर परिसरातील वातावरण सकाळी अतिशय प्रसन्न वाटते. पारायण विभागात रोहित पोकळे, किरण सोनवणे, शुभम काळे, प्रशांत काळे, नंदू शिंदे, दादा म्हेत्रे हे व्यवस्थापन पाहतात.
श्रावण शुद्ध पंचमीला (नागपंचमी) श्रीनागेश्वराची यात्रा असते. या उत्सवाच्या निमित्ताने येथे सद्गुरु संत वामनभाऊ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने ४ ऑगस्ट पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहा निमित्त दररोज पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी 8:30 ते 10 शिवलीलामृत पारायण 10 ते 12 वा. गाथा भजन, दुपारी 4 ते 5.30 वा. संत गोरोबा काकांचे श्रीक्षेत्र तेर येथील सकल संत चरित्रकथा निरुपणकार ह.भ.प. श्री. दिपकजी महाराज यांचे पसायदान भावार्थ निरुपण, 5.30 ते 6.30 वा. सायंकाळी ७ ते ९ वा. कीर्तन व नंतर आलेल्या सर्व भक्तांना भोजन असा भव्य कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे.
श्रीनागेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त गुरुवारी प्रातःकाळी यजमान श्री.निलेश देशमुख व सौ.शुभदा देशमुख यांचा लघुरुद्र अभिषेक संपन्न झाला. यावेळी वेदमूर्ती श्री मयूर देशपांडे गुरुजी, श्री.विवेक देशपांडे गुरुजी, श्री.गौरव घायाळ गुरुजी, श्री.लक्ष्मीकांत काळे गुरुजी
आधी गुरुजी उपस्थित होते. शुक्रवारी सकाळी श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे विश्वस्त दिलीपकुमार राजगुरू व सौ. वैशाली दिलीपकुमार राजगुरू यांच्या हस्ते श्रीनागेश्वराची विधिवत पूजा होईल. नंतर पालखीमध्ये श्रीनागेश्वराचा मुखवटा ठेऊन ही पालखी रथात ठेवली जाईल. परीसरातील सर्व भजनी मंडळाच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात हरहर महादेवाच्या जयघोषात मिरवणुकीस सुरुवात होईल. श्रीनागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, संविधान चौक, श्री विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, महादेव गल्लीमार्गे ही दिंडी नव्याने झालेल्या वैतरणा नदीतील रस्त्याने श्रीनागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचेल नंतर आरती व महाप्रसाद होईल. दरम्यान, दिंडोरी प्रणीत श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी मंदिरासमोर होमहवन करतील.
या निमित्ताने सुरू असलेल्या नाम सप्ताहामध्ये गुरुवारी ह. भ. प. रामकृष्ण महाराज रंधवे, शुक्रवारी ह. भ. प. संदिप महाराज येवले, नाशिक व शनिवारी सायंकाळी ह. भ. प. अशोक महाराज हुंबे आळंदी यांची कीर्तने होतील. रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे अध्यापक ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज कदम (मोठे माऊली) यांचे कारल्याचे कीर्तन होईल व महाप्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगता होईल.