जामखेड -
रत्नदीप मेडिकल काॅलेजचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्याविरूध्द वनविभागाच्या वतीने भारतीय वन्यजीव १९७२ च्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने डाॅ.मोरेच्या अडचणीत भर पडली आहे.
फोटो - जखमी अवस्थेत आढळुन आलेले हरिण
याबाबत शनिवारी (ता.९) विद्यापीठ समिती तपासासाठी आली असता, यादरम्यान काॅलेजमध्ये दोन हरीण व्हीडिओमध्ये आढळून आले. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला तोच धागा पकडून यातील काही आंदोलनकर्त्यांनी कॉलेजच्या एका खोली मध्ये हरीण असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर रविवारी (ता. १० ) वनविभागाचे वनसेवक तहेरभाई सय्यद यांना फोनवर जखमी अवस्थेत हरीण असल्याचे कळवले.यावर जखमी अवस्थेतील हरणास येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हरणाचे मागील दोन्ही पायांना जखम झाली होती. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खेत्रे यांनी या हरणावर उपचार केले.
दरम्यान वनसंरक्षक तेलंगे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर शेळके व त्यांच्या पथकाने आंदोलनकर्त्यासमवेत रत्नदीप कॉलेज मधील खोलीची तपासणी केली असता त्याठिकाणी हरणाची विष्ठा आढळुन आली. त्यावरुन ताब्यात घेतलेले हरीण याच खोलीत ठेवले असल्याचे निदर्शनास आले.
त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या व्हीडिओमधील हरीण व सापडलेले हरीण एकच असल्याचे निष्पन्न झाले आहे. या नुसार रत्नदीप मेडिकल काॅलेजचे डॉ भास्कर मोरे यांचेवर भारतीय वन्यजीव १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वनपरिक्षेत्राचे अधिकारी मोहन शेळके यांनी दिली.