स्वामींची भक्ती, गुरूंची सेवा, पितृ वचन, पतीची सेवा, तसेच दुःखीत, पीडित, अनाथ, दीनदुबळ्यांची सेवा ही सुद्धा विष्णूचीच सेवा आहे असे मत ह.भ.प. श्री मनोहर महाराज इनामदार यांनी व्यक्त केले.
जामखेड येथील तपनेश्वर भागातील हनुमान मंदिर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ह.भ.प. श्री. मनोहर महाराज इनामदार यांचे रविवारी रात्री कीर्तन झाले. यावेळी त्यांनी आपले विचार मांडले.
स्वामीकाज गुरुभक्ति l पितृवचन सेवापती ll
हेची विष्णूची महापूजा l अनुभव नाही दुजा ll
जगतगुरु तुकोबाराय यांच्या या अभंगावर श्री इनामदार सर यांनी अतिशय सोप्या भाषेत चिंतन मांडले. विष्णूची महापूजा अर्थात देवाची महापूजा कशाने घडते हे सविस्तर त्यांनी समजावून सांगितले. गुरुंची आज्ञा पाळणे, त्यांची मनोभावे सेवा करणे, स्वामी अर्थात मालकाचे काम प्रामाणिक करणे, पितृ वचन पाळणे, पत्नीने पतीची सेवा प्रामाणिक पणे करणे ही श्रेष्ठ सेवा आहे. त्याचबरोबर समाजामधील जे पीडित आहेत रंजलेले,गाजलेले आहेत त्यांची सेवा करणे त्यांची गरज भागवणे ही सुद्धा एक मोठी सेवाच आहे. या सर्व सेवेतून विष्णूची महापूजा घडते. असे अतिशय सरळ सोप्या भाषेत श्री. इनामदार सर यांनी चिंतन मांडले.
जामखेड शहरातील तपनेश्वर भागातील हनुमान मंदिर या ठिकाणी हनुमान मंदिर ट्रस्ट व तपनेश्वर भजनी मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.
गुरुवारी दि. 30 मार्च 2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह.भ.प. श्री. कैलास महाराज भोरे देवदैठण यांचे राम जन्माचे कीर्तन झाले व सप्ताहास प्रारंभ झाला. सायंकाळी ह. भ. प. अशोक महाराज चिंचपूर, शुक्रवारी ह. भ. प. श्री विजय महाराज बागडे सर जामखेड, शनिवारी ह. भ. प. श्री. महबूब महाराज सौताडा यांची कीर्तने झाली. रविवारी ह.भ.प. श्री. मनोहर महाराज इनामदार सर जामखेड यांचे कीर्तन झाले.
सोमवारी सुनील महाराज दूधवंडीकर, मंगळवारी ह. भ. प. श्री. अशोक महाराज भाकरे पाटोदा, बुधवारी ह. भ. प. श्री. विश्वनाथ महाराज नन्नवरे अरणगाव यांची कीर्तने होतील गुरुवारी दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत श्रीक्षेत्र सिताराम गड खर्डा येथील मठाधिपती ह. भ. प. श्री. महालिंग महाराज नगरे यांचे काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. या कार्यक्रमासाठी शहरातील हनुमान मंदिर ट्रस्ट व तपनेश्वर भजनी मंडळाचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत. तसेच, शहरातील विठ्ठल भजनी मंडळ श्री नागेश्वर भजनी मंडळ व इतर भजनी मंडळे या सप्ताहासाठी सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.
Tags
धार्मिक