धन्य ते अरण रत्नाची खाण |
जन्मला निधान सांवता तो || १||
सांवता सागर प्रेमाचे आगर |
घेतला अवतार माळ्या घरी || २ ||
धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता |
साठविला दाता त्रेलोक्याचा | | ३ ||
नामा म्हणे त्याचा जन्म सुफल झाला |
वंश उद्धरिला माळीयाचा || ४ ||
या अभंगात संत नामदेवराय यांनी संत सावता महाराज यांचे वर्णन केलेले आहे. संत सावता महाराज यांच्या विषयी संत नामदेवराय यांना आदर होता हे या स्तुतीवरून लक्षात येते तसे नामदेवराय यांनी सर्व संतांचे गुणगान गायलेले आहेत.
संत सावता महाराज यांचे जीवन अन्य संतांपेक्षा थोडे वेगळे होते त्यांनी सतत पांडुरंगाचे स्मरण केले परंतु हातातले काम टाकून सहसा पंढरपूरला गेले नाहीत. त्या कामातच त्यांनी परमात्म्याला पाहिले परंतु मुखातून नामस्मरण कधीही सोडले नाही पाहुयात त्यांच्या जीवन कार्याविषयी थोडीशी माहिती.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात अरण हे सावता महाराज यांचे गाव. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा होते, ते पंढरीचे वारकरी होते त्यांना दोन मुले होती पुरसोबा आणि डोंगरोबा पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत, पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावता महाराज यांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले. भेंड हे गाव जवळच दोन मैलांवर आहे.
भेंड गावचे 'भानवसे रूपमाळी' या घराण्यातील जनाईशी सावता महाराज यांचा विवाह झाला. त्यांनी उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाबाई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळी यांनी सेना न्हावी नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगात वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली. सावता महाराज यांचे अभंग काशीबा गुरव हे लिहून ठेवत असत.
'साव' म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता.
'आमची माळियाची जात!
शेत लावू बागाईत'!
असे ते एका अभंगात म्हणतात.
सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वारसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे संत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. 'कर्मे ईशु भजावा' हीच त्यांची वृत्ती होती. पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.
अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्माचरणातील अंधश्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग- जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन केल्यास ईश्वरप्राप्ती होते हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.
'स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।'
'सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा ।' या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्यभक्ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रससिद्ध आहे.
'योग याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता । । तीर्थव्रत दान अष्टांग । याचा पांग आम्हा नको।। हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला. नामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्वर भेटतो. 'प्रपंची असूनि परमार्थ साधावा । वाचे आळवावा पांडुरंग,
मोट, नाडा, विहीर, दोरी । अवघी व्यापिली पंढरी.
सावता माळी हे आपल्या दैनंदिन कामकाजात विठ्ठलाचेच रूप पाहात असत. त्यांच्या सासुरवाडीचे लोक एकदा त्यांच्याकडे आले. सावता माळी भजनात रंगून गेले होते. त्यांनी सासुरवाडीच्या लोकांकडे लक्ष दिले नाही. पत्नी संतापली.
आपल्या कामात परमेश्र्वर पाहणारे, काम हाच परमेश्वर अशी दृढ श्रद्धा बाळगणारे आणि स्वतःच्या पत्नीसही अधिकारवाणीने परमार्थाचा उपदेश करणारे सावता माळी त्यांच्या काळात महाराष्ट्राच्या भक्तीच्या मळयाची मनोभावे जपणूक करीत होते.
ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया- वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. 'न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची' असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ४० अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशीला
संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.
सौजन्य - गुगल 'संत साहित्य'