महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
"जास्त काही करण्यापेक्षा आई-वडिलांची सेवा करा म्हणजे ईश्वर प्राप्ती होईल कारण आई-वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे." असे प्रतिपादन रघुनाथ महाराज चौधरी यांनी केले. जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या श्रीनागेश्वर पालखी सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह व शिवलीलामृत पारायण या संपूर्ण उत्सवाची बुधवारी ह.भ.प. श्री. रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
(फोटो - समितीच्या वतीने संत सेवेचे यजमान नगरसेवक अमित चिंतामणी यांनी रघुनाथ महाराज यांचे स्वागत केले.)
जगद्गुरु तुकोबाराय यांच्या काला या प्रकरणातील,
आता हे चि जेऊ | सवे घेऊ शिदोरी ||
हा अभंग रघुनाथ बाबांनी कीर्तनासाठी निवडला या अभंगाला सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक गुरुवर्य श्री. परमेश्वर महाराज जायभाये यांनी अतिशय गोड चाल गायली.
या अभंगावर बोलताना रघुनाथ बाबा म्हणाले, "सात दिवस श्रीनागेश्वर भगवंताच्या या उत्सवामध्ये अनेक नामवंतांची कीर्तने आपण श्रवण केली. माझ्याकडे काल्याच्या कीर्तनाची सेवा आली आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने केवळ भगवान श्रीकृष्ण यांचे चरित्र सांगावे. ते ही केवळ गोकुळात केलेले चरित्र सांगावे असा नियम आहे. काल्याच्या कीर्तनात अन्य विषय कीर्तनकारांनी सांगू नयेत. गोकुळात केलेले चरित्र म्हणजे श्रीकृष्ण भगवंताने ज्या बाललीला केल्या, त्या अतिशय सुंदर आहेत. भगवंताने गोकुळात खोड्या केल्या चोऱ्या केल्या आणि आपल्या बालगोपाळांच्या सोबत अनेक खेळ खेळले."
भगवंताचे चरित्र सांगत असतानाच समाजातील अनेक रूढी परंपरावर रघुनाथ बाबांनी परखड शब्दात आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले" परमार्थ थोडा कमी करा, देव देव थोडा कमी करा परंतु आपल्या आई-वडिलांची सेवा करा. आई-वडिलांची सेवा न करता तुम्ही अन्य कोणतेही किती मोठे काम करा तुम्हाला देव भेटणार नाही." काल्याचा अभंग म्हणून रघुनाथ बाबा यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली व नंतर यजमानांच्या हस्ते आरती झाली. यानंतर महाप्रसाद झाला.
यावेळी कीर्तनाला मोठी गर्दी झाली होती.
शेवटी संत सेवेचे यजमान नगरसेवक अमित चिंतामणी यांनी ह.भ.प. रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांचा सन्मान केला. तसेच महाप्रसादाचे यजमान मंदाबाई चंदन व अलकाताई जाधव व त्यांचा परिवाराच्या हस्ते महाआरती करण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक तसेच चंदन आणि जाधव परिवार यांच्यावतीने महाप्रसादाची पंगत झाली त्यावेळी भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.
कीर्तनाच्या वेळी मृदंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज जायभाये, सुदाम महाराज गायकवाड, ईश्वर महाराज तौर, दादासाहेब महाराज सातपुते, पंढरीनाथ महाराज राजगुरू, मृदंगाचार्य हरिदास महाराज गुंड, विठ्ठल भजनी मंडळ, श्रीनागेश्वर भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ, संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था, जगदाळे वस्ती भजनी मंडळ, बटेवाडी भजनी मंडळ व पंचक्रोशीतील भजनी मंडळींनी साथसंगत केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात नगरसेवक दिगंबर चव्हाण, प्रा.ज्ञानदेव कुंभार, नगरसेवक डॉ.ज्ञानेश्वर झेंडे, नगरसेवक अमित चिंतामणी, कॅप्टन लक्ष्मणराव भोरे शहाजी राऊत, दिपक महाराज गायकवाड उपस्थित होते.
यावेळी कीर्तन सुरू होण्यापूर्वी सकाळी सहा वाजता शिवनेरी अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ करून घेतला. तसेच या विद्यार्थ्यांनी सात दिवस संध्याकाळच्या पंगतीच्या वेळी सेवा केली. तसेच श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड . या संस्थेचे संचालक बबलू टेकाळे यांनीही आपले विद्यार्थी सोबत घेऊन सात दिवस येथे उत्सवात परिश्रम घेतले.
या संपूर्ण उत्सवासाठी श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, मिलिंद ब्रम्हे, विनायक राऊत, सिताराम राळेभात, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, संतोष बारगजे, दिलीप कुमार राजगुरू, पांडुरंग भोसले, महादेव पानसाडे, बबन सुर्यवंशी, किरण सोनवणे,नंदू शिंदे, प्रशांत काळे, सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे, ओम गुरव, श्री नागेश्वर भजनी मंडळाचे जगन्नाथ महाराज धर्माधिकारी(मेजर),शेषेराव मुरूमकर, त्र्यंबक वराट, मुरलीधर काळे, गिरधारीलाल ओझा, संतोष राळेभात पाटील अहोरात्र अथक परिश्रम घेतले.


