महापरिनिर्वाण दिनी महामानवांस अभिवादन
जामखेड : ग्रामीण आरोग्य प्रकल्प जामखेड, विनोबा भावे ग्रामविकास प्रतिष्ठान मलठण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचारमंच माहिजळगाव व जनविकास सेवाभावी संस्था जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी युवा शास्त्रज्ञ व जैवविविधता संशोधक रणजित रावसाहेब राऊत यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाला पोपट खोसे, नवनाथ शिंदे, जयेश कांबळे, लक्ष्मीताई पवार, वैशालीताई शिंदे, रामकवर कोल्हे ताई, ह.भ.प. गाडे महाराज, मच्छिंद्र कुतवळ यांसह विविध सामाजिक संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना रणजित राऊत यांनी तरुण पिढीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला “शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश अंगीकारण्याची गरज असल्याचे सांगितले. महामानवांचे विचार आधुनिक समाजाला दिशा देणारे असून सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनासाठी ते आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश कांबळे यांनी केले तर पोपट खोसे यांनी उपस्थितांचे आभार मानले .