सौताडा गावच अध्यात्मिक क्षेत्रातील वैभव हरपले!
पाटोदा प्रतिनिधी :
सौताडा गावच्या अध्यात्मिक क्षेत्राला मोठा धक्का बसला असून वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. महेबूब महाराज शास्त्री यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
ह.भ.प. महेबूब महाराज शास्त्री यांनी आपल्या वेगळ्या आवाजाच्या शैलीत, विनोदी उदाहरणे व प्रभावी दाखले देत कीर्तनातून समाजप्रबोधनाचे कार्य आयुष्यभर केले. त्यांच्या सुमधुर व विचारप्रवर्तक कीर्तनांना संपूर्ण महाराष्ट्रभर मोठी पसंती मिळत असे. त्यांचे कीर्तन ऐकणे ही भाविकांसाठी एक पर्वणीच मानली जात होती.
सौताडा येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह, हरिपाठ, जागर, लक्ष्मण शक्ती सोहळा तसेच दिंडी सोहळ्यांमध्ये त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमांना विशेष आकर्षण प्राप्त होत असे. त्यांच्या उपस्थितीमुळे या धार्मिक सोहळ्यांना चार चांद लागत असत.
गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर जामखेड येथे उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
ह.भ.प. महेबूब महाराज शास्त्री यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाने एक अभ्यासू, प्रभावी व लोकाभिमुख कीर्तनकार गमावला असून सौताडा गावाने आपला अध्यात्मिक मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या आठवणी आणि कार्य कायम स्मरणात राहतील.
जाहिरात 👇