संत वामनभाऊंचे कार्य महान - श्रीहरी महाराज पुरी, आज आसाराम महाराज बडे यांचे कीर्तन

 
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : 
संत वामनभाऊ महाराज यांचे कार्य महान होते. त्यामुळेच आज सर्वत्र वामनभाऊ महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी होताना दिसत आहे. संतांनी अखंड नामस्मरण केले आणि भगवंतास प्राप्त करून घेतले. सतत नाम नामस्मरण केल्यामुळे संतांना सर्व सुखाची प्राप्ती झाली. आपणही सतत नामस्मरण करून भगवत प्राप्ती करून घेऊ शकतो व सर्व सुखाचे अनुभव घेऊ शकतो. असे प्रतिपादन श्रीहरी महाराज पुरी यांनी केले. आज रविवारी आसाराम महाराज बडे यांचे कीर्तन होईल 


जामखेड शहरालगत असलेल्या जमादारवाडी येथील श्री संत वामनभाऊ गड या ठिकाणी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:45 वाजता पुष्पवृष्टी होऊन संत वामनभाऊ महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी झाली व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला. 

 संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या नऊ वर्षापासून जमादारवाडी येथे भव्य सप्ताहाचे आयोजन केले जाते. 

सकाळी संत वामनभाऊ महाराज, गहिनीनाथ महाराज व श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्तीची महापूजा होऊन नऊ वाजता पुण्यतिथी निमित्त भजन सुरू झाले. संत वामनभाऊ महाराज की जय असा जयजयकार करत ठीक पावणे बारा वाजता पुष्पवृष्टी झाली. नंतर महाप्रसाद झाला. परिसरातील भाविकांनी यावेळी गर्दी केली. 

येथे सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहात शनिवारी राजाभाऊ महाराज कुलकर्णी यांचे प्रवचन झाले सात ते नऊ या वेळेत श्रीहरी महाराज पुरी आष्टी यांचे कीर्तन झाले. यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 
सदा नाम घोष करू हरी कथा 
या अभंगावर पुरी महाराज यांनी अतिशय गोड कीर्तन केले. ते म्हणाले "प्रत्येकाला सुखाची प्राप्ती करून घ्यावी वाटते. प्रत्येक जण सुख शोधतो. प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा हे सर्व सुखाचे आगर आहेत. आणि पांडुरंगाला प्राप्त करून घ्यायचे असेल तर सतत नामस्मरण करावे लागते. आणि हे केल्याने तो आपल्याला प्राप्त होऊ शकतो. हा जगद्गुरु तुकोबारा यांचा अनुभव आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून 'सदा नाम घोष करू हरी कथा' असे म्हणतात त्यांनी आपल्याला केवळ उपदेश केला नाही सदा नाम घोष करा असे म्हटले नाही सदा नाम घोष करू हरिकथा असे म्हटले आहे. म्हणजेच आपण सर्वजण मिळून भगवंताचे नामस्मरण करू असे तुकोबारायांना या अभंगातून सांगायचे आहे. "
पुरी महाराज यांचे कीर्तन झाल्यानंतर सायंकाळी आरती करण्यात आली व नंतर आलेल्या सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 

रविवारी दत्ता महाराज खवळे यांचे प्रवचन होईल व सायंकाळी सात ते नऊ आसाराम महाराज बडे आळंदी यांचे कीर्तन होईल . 
सोमवारी अंगद महाराज ढोले यांचे प्रवचन तर सायंकाळी सात ते नऊ नारायण महाराज दौंड राजुरी यांचे कीर्तन होईल. मंगळवारी अर्जुन महाराज नेटके यांचे प्रवचन तर सायंकाळी शिवचरित्रकार आकाश महाराज भोंडवे यांचे कीर्तन होईल. बुधवारी दत्तात्रय महाराज डुचे यांचे प्रवचन तर राम महाराज शास्त्री आळंदी यांचे कीर्तन होईल. गुरुवारी मच्छिंद्र महाराज राऊत यांचे प्रवचन तर सायंकाळी गहिनीनाथ महाराज खेडकर घाटशीळ पारगाव यांचे कीर्तन होईल. शुक्रवार दिनांक 14 रोजी दुपारी चार ते सहा दिंडी प्रदक्षिणा व सायंकाळी 9 ते 11 रघुनाथ महाराज चौधरी धामणगाव यांचे कीर्तन होईल शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते 11 श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत श्री विठ्ठल महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर सार्वजनिक महाप्रसादाने संपूर्ण उत्सवाची सांगता होईल. 

दररोज सकाळी पहाटे चार ते सहा काकडा, सहा ते सात विष्णु सहस्त्रनाम, सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण, दहा ते बारा गाथा भजन, चार ते पाच प्रवचन, पाच ते सहा हरिपाठ, रात्री सात ते नऊ हरिकीर्तन व नंतर हरिजागर. किर्तन संपल्यानंतर दररोज आलेल्या सर्व श्रोत्यांची अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी या संपूर्ण उत्सवाचा लाभ घ्यावा व यथाशक्ती सहकार्य करावे असे आवाहन संत वामनभाऊ गड सप्ताह समिती व जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post