खर्डा रविवार दि.९ जून २०२४ रोजी खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा या शाळेतील एस् एस् सी १९९० च्या बॅचचा स्नेह मेळावा अर्थात गेट टुगेदर सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. बहुतेक ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे वर्ग मित्र, मैत्रिणी चौतीस वर्षांनी प्रथमच भेटले तेव्हा एकमेकांना ओळखता आले नाही. व्हाट्सऍपच्या माध्यमातून संपर्क झाल्या मुळे सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या बॅचला अध्यापन करणारे शिक्षक वृंद आदरणीय गहिनीनाथ काकडे सर, अशोक भांडवले सर, रामचंद्र गुरसाळी सर, गेनबा शिंदे सर, गोरखनाथ राजगुरू सर ,घनवट सर, यांची उपस्थिती लाभली.
उपस्थित सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उपस्थित शिक्षकांना फेटे बांधून पुष्पवृष्टी करत कार्यक्रम स्थळी आणले. पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
जेष्ठ शिक्षक गहिनीनाथ काकडे सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले तर प्रमुख उपस्थिती मध्ये,अशोक भांडवले सर, गोरखनाथ राजगुरू सर, रामचंद्र गुरसाळी सर, गेनबा शिंदे सर, घनवट सर, माजी विद्यार्थी श्री दादासाहेब गिते उपजिल्हाधिकारी पुणे, वैजीनाथ पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड, पोलिस निरीक्षक विक्रम गौड, पी एस आय रामा पवडमल, साहित्यिक गोकुळ गायकवाड, हे उपस्थित होते.
सर्व शिक्षकांना मानाचा फेटा बांधून सन्मानचिन्ह, शाल, बुके आणि माजी विद्यार्थी गोकुळ गायकवाड लिखित धम्मपदा बोलती दोहे आणि गाथा हा ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. तर सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शाळेचे नाव असलेला सुंदर पेन भेट देण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबई,पुणे,ठाणे, नासिक, पोलादपूर अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माजी विद्यार्थी उपस्थित झाले होते.
आपले मनोगत व परिचय करून देताना अनेकांच्या भावना अनावर झाल्या. संपूर्ण दिवस गप्पागोष्टी करत एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपुस केली. सर्वजनावर कुटुंबाची जबाबदारी असताना आज आपल्या मित्र मैत्रिणीसाठी एक दिवस राखून ठेवला होता. मुलींची उपस्थिती उल्लेखनीय होती. त्या प्रचंड आनंद लुटताना दिसून आले. यापुढे सतत एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे असे सर्वानुमते ठरले. प्रत्येक वर्षी अशा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्याचेही ठरविण्यात आले.
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही , शिक्षण हा प्रगतीचा राजमार्ग आहे. शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते बोलत होते. तसेच त्यांनी विपश्यना करण्याचा सर्वांना आग्रह केला. आदरणीय काकडे सर यांनी अध्यक्षीय भाषणात अनमोल मार्गदर्शन केले. १९९० ची ही एस् एस् सी बॅच अतिशय कर्तबगार आणि समजदार असल्याचा उल्लेख केला.
सकाळी दहा वाजता सर्वांनी एकत्रित नाश्ता केला दुपारी स्नेह भोजन केले. तर सायंकाळी गप्पा गोष्टी करत करत पाव भाजीवर ताव मारला .पावसाची रिपरिप सुरू झाली तरी सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. जाताजाता शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमातून कोणाचाही पाय निघत नव्हता. एकमेकांचा निरोप घेताना नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. शेवटी सिताराम बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुढील वर्षी नक्की भेटू हे वचन देऊन प्रत्येकजण मार्गस्थ झाले. या कार्यक्रमामुळे अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश निकम, अशोक होडशिळ, सुहास गोलेकर पाटील, शंकर काशिद, मनिष सहानी,बबन बारगजे, वैजीनाथ पाटील, नवनाथ गोपाळघरे धन्यकुमार दाहितोडे, अलका कोकाटे, सह अनेकांनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रयाग शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ कुमुदिनी काकडे यांनी केले.