कंटेनर व कार अपघातात डोमरी येथील "गुरूकुल" चे संस्थेचे संचालक सुदाम (काका) भोंडवे यांचेसह कुटूंबातील चौघे ठार

    



महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : (२२ फेब्रुवारी) 

    पुणे-नगर रस्त्यावर, कारेगाव (ता. शिरूर) जवळ  रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने मोटार आदळून झालेल्या अपघातात बीड जिल्ह्य़ातील सोनदरा गुरूकुल संस्थेचे संचालक सुदाम शंकर भोंडवे (वय ६६) यांच्या सह त्यांच्या  कुटूंबातील चौघे ठार झाले. मृतांत चार वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. सोमवारी (दि. २१) दुपारी १२ :३० च्या सुमारास झालेल्या या अपघातांत मोटारचालकही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. 

    बीड जिल्ह्य़ातील डोमरी येथील सोनदरा गुरूकुल संस्थेचे प्रमुख सुदाम भोंडवे यांचा मुलगा, अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते वडील सुदाम भोंडवे, आई सिंधुताई, पत्नी कार्तिकी व मुलगी आनंदी यांच्यासह इंडिका मोटारीतून (क्र. एमएच १२ ईएम २९७८) चाकणकडे चालले होते. सुदाम हे स्वतः मोटार चालवित होते. त्यावेळी हा अपघात घडला या अपघातात सुदाम शंकर भोंडवे (वय ६६), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय ६०), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय ३२) व आनंदी अश्वीन भोंडवे (वय ४ वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) यांचा मृत्यू झाला. तर अश्विन सुदाम भोंडवे (वय ३५) हे या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत.या अपघातप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कंटेनर चालक बबलू लहरी चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

    या अपघातात मृत्युमूखी पडलेले सुदाम शंकर भोंडवे हे डोमरी (ता. पाटोदा, जि. बीड) येथील सोनदरा गुरूकुल संस्थेचे संचालक होते, त्यांचा मुलगा अश्विन हे देखील पुण्यातील शैक्षणिक संस्थांशी संबंधित आहेत. दोघांचेही शैक्षणिक कार्यात योगदान असून, काल त्यांच्या सोनदरा गूरूकुल संस्थेतील पालक मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी ते कुटूंबियांसह डोमरी येथे गेले होते. तेथून ते कौटुंबिक कामानिमीत्त चाकण येथे येत असताना वाटेतच ही दुर्दैवी घटना घडली

आनंद हरपला...

    सुदाम भोंडवे व त्यांच्या पत्नी सिंधुताई यांना चार वर्षीय नात आनंदी हिचा विशेष लळा होता. आनंदी च्या येण्याने त्यांचे घर खरोखर आनंदमय झाले होते. आनंदीच्या एका वाढदिवसाला सुदाम भोंडवे यांनी तीच्यावर एक काव्य केले होते. अश्विन यांचाही कन्येवर विशेष स्नेह होता. त्यांच्या फेसबुकवरून आज या आठवणी ताज्या झाल्या. आई - वडीलांचे छत्र आणि सहचारिणीच्या साथीबरोबरच; जीवनात आनंद भरणारी चिमुकली आनंदीही त्यांना आज सोडून गेल्याने त्यांच्यावर आभाळच कोसळले.

अपघाताची वार्ता कळताच बीड जिल्हा सुन्न

    पाटोदा गरीब, अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या आणि शेकडो-हजारो गरीब, अनाथ मुलांची  हक्काची सावली झालेले सुदाम भोंडवे व सिंधुताई या दाम्पत्याचा कार अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी घडलेल्या घटनेचे वृत्त समजताच अनाथ मुलांचेच नव्हे तर संपूर्ण गुरुकुल परिवाराचे आणि जिल्ह्यातील नागरिकांचे काळीज अक्षरशः हेलावून गेले. सुदाम काकांच्या जाण्याने सोनदरा गुरुकुलचा आधार हरपला, अशी संवेदना प्रत्येक जण व्यक्त करीत होता.

    नेहमी दुष्काळी छायेत आणि आर्थिकदृष्ट्या मागास बीड जिल्ह्यातून साखर कारखान्यांच्या गाळप हंगामात दरवर्षी दोन लाखांहून जास्त कुटुंबे सहा महिन्यांसाठी तात्पुरते स्थलांतरित होतात. या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात अडथळा येतो. हा अभावच सामाजिक समस्यांचे मूळ असल्याने १९८६ मध्ये राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुदाम भोंडवे यांनी स्वत:ची जमीन देत सोनदरा गुरुकुलाची स्थापना केली.एका छोट्याशा झोपडीतून ज्ञानदानाची सुरुवात करत गत ३७ वर्षांत त्यांनी हजारो विद्यार्थी घडविले. हे कार्य करत असताना त्यांनी शासनाची कुठलीही मदत मिळवली नाही समाजसेवा हाच त्यांचा धर्म होता अशा या महान समाजसेवकाला आमची मानवंदना

                                                                           जाहिरात👇



                                                                         

Post a Comment

Previous Post Next Post