महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजन; स्पर्धेची गटविभागणी जाहीर
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्यातर्फे जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली 21व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ गट पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
जळगाव येथील सागर पार्क मैदानावर 11 ते 14 मार्च दरम्यान या स्पर्धा घेण्यात येतील. या स्पर्धेची गटवारी आज (रविवारी) जाहीर करण्यात आली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या पुरुष 16 व महिला 16 संघाची 4-4 गटात विभागणी करण्यात आली.
पुरुषांच्या ‘अ’ गटात महाराष्ट्राचा विजेता मुंबई शहर व विदर्भ विजेत्या अमरावती एकाच गटात असून सांगली, कोल्हापूर अन्य संघ त्या गटात आहेत. महिला ‘अ’ गटात देखील पुणे, नागपूरच्या बरोबर कोल्हापूर, रत्नागिरी संघांचा समावेश आहे. तर ‘ब’ गटात मुंबई शहर, मुंबई उपनगर एकमेकाला भिडतील. एकूणच गट विभागणी पाहाता दोन्ही विभागात सामने चुरशीचे होतील असे वाटते. परंतु, महाराष्ट्रात खेळणार्या जिल्ह्यातील संघात कोकण पट्ट्यातील खेळाडूंचा अधिक भरणा असतो. या स्पर्धेच्या कालावधीत कोकणात शिमगोत्सव जोरात असतो. त्यामुळे कोकणातील खेळाडू खेळाला की, सणाला अधिक महत्त्व देतात यावर या स्पर्धेची चुरस अवलंबून असणार आहे. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या तांत्रिक समितीने तयार केलेली ही गटवारी राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी एका परिपत्रकाद्वारे प्रसार माध्यमाकरिता जाहीर केली.
पुरुष विभाग गट विभागणी
अ गट : मुंबई शहर, सांगली, कोल्हापूर, अमरावती.
ब गट : अहमदनगर, नाशिक, पुणे, वाशीम
क गट : मुंबई उपनगर, धुळे, ठाणे, नागपूर.
ड गट : नांदेड, रत्नागिरी, नंदुरबार, वर्धा.
महिला विभाग गट विभागणी
अ गट : पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर.
ब गट : मुंबई शहर, मुंबई उपनगर, धुळे, अमरावती.
क गट : नंदुरबार, ठाणे, रायगड, अकोला.
ड गट : पालघर, नाशिक, नांदेड, बुलढाणा.
