महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
पंढरपूर महोत्सव आयोजित महिला कुस्ती स्पर्धेत श्रीगोंद्याची आंतरराष्ट्रीय पैलवान भाग्यश्री फंडने खुल्या गटात महिला केसरीची मानकरी ठरली.
या स्पर्धा पंढरपूर येथे पार पडल्या. स्पर्धेमध्ये राज्यातील महिला कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत इंटरनॅशनल कुस्ती संकुलात प्रेक्षणीय कुस्त्या करत सर्वांची मने जिंकली. उपांत्य सामन्यात कर्जतची पैलवान सोनाली मंडलिकवर मात करत भाग्यश्रीने अंमित लढतीत प्रवेश केला. अंमित लढतीमध्ये पहिली महिला महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतीक्षा बागडे हिच्याबरोबर संयमी आणि प्रेक्षणीय कुस्ती करत 11-3 गुण फरकाने एकतर्फी विजय संपादन करत पंढरपूर महोत्सव महिला केसरी किताब व गदेची मानकरी ठरली.
या विजयाचे श्रेय भाग्यश्रीने वडील मेजर हनुमंत फंड यांना दिले. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. याच स्पर्धेत इंटरनॅशनल कुस्ती संकुलातील महिला पैलवानांनी आपल्या वजन गटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामध्ये 40 किलो वजन गटामध्ये पैलवान समीक्षा काळे रौप्य पदक, 46 किलो वजन गटात पैलवान श्रेया मांडवे सुवर्ण पदक व 57 किलो वजन गटात आश्लेषा बागडे सुवर्ण पदक मिळवले. इंटरनॅशनल कुस्ती संकुल राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये पदके मिळवून महाराष्ट्रात नावलौकिक मिळवत आहे. महिला पैलवानांना तालमीचे प्रशिक्षक समाधान खांडेकर, प्रा. संजय डफळ, तालमीचे अध्यक्ष मेजर हनुमंत फंड यांचे मार्गदर्शन लाभले.
Tags
क्रिडा