महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महावितरणच्या गलथान कारभारामुळे ऐन उन्हाळयात जामखेड शहरातील लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी निवेदन प्रसिध्द केले असून, त्यात म्हटले आहे की , जामखेड शहरातून नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बऱ्याच ठिकाणच्या केबल तुटलेल्या आहेत. तीन तीन दिवस सबंधीत लोकांना वीजपुरवठा पुर्ववत चालू करून दिला जात नाही. याबाबत वारंवार तक्रार करूनही महावितरणचे सबंधीत अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. नियमीत वीजबील करणा-या घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांना महावितसणच्या या गलथान कारभाराचा मोठा फटका बसला असल्याचे कोठारी यांनी सांगितले.
जे लोक आकडा टाकुण, उघडउघड वीज चोरी करतात त्यांच्याकडे महावितरणचे अधिकारी ,कर्मचारी सोईस्कर दुर्लक्ष करतात. महावितरणचेच काही कर्मचारी पैसे घेऊन मीटरमध्ये छेडछाड करून बिल कमी यावे म्हणून वीजचोरीसाठी अप्रत्यक्षपणे ग्राहकांना मदत करताना दिसतात. असा आरोप संजय कोठारी यांनी केला आहे. कधी केबल नाही तर कधी मिटर नाही ही महावितरणच्या जामखेड कार्यालयाची नेहमीच बोंब आहे.
विविध ठिकाणच्या डिपी जळाल्यानंतर स्थानिक लोकांना वर्गणी करून, जळालेली डिपी दुरूस्त करावी लागत आहे. लोकांनी वीज जोडणी मिळवण्यासाठी कोटेशन घेऊन पैसे भरले आहे. परंतु त्यांना अंतर जास्त आहे, तुम्ही वीज खांब घ्या.अशी कारण सांगूण त्यासाठी वर्ष वर्ष लोकांना वीजजोडणीसाठी खोळंबून ठेवले जाते. वीज जोडणीसाठी मीटर चे पैसे भरून मीटर दिले जात नाही.
दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे दुरूस्तीचे हे काम रस्त्याच्या सबंधीत ठेकेदाराचे आहे आमचे नाही. असे सांगून,टोलवाटोलवी केली जाते. मात्र या दोघांच्या हलगर्जीपणामुळे नगर रस्त्यावरील नागरी भागात चार दिवस वीज पुरवठा खंडीत होता.
याप्रश्री दखल घेवून तातडीने कार्यवाही करावी अन्यथा जामखेड ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिला आहे.