श्रीनागेश्वर मंदिर परिसरात बहावा व गुलमोहर फुलला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 
   जामखेड येथील श्री नागेश्वर मंदिर परिसरातील बहावा व गुलमोहर झाडाला अतिशय सुंदर अशी फुले आल्यामुळे तेथील वातावरण प्रसन्न व मनमोहक बनले आहे. 

   जामखेड चे ग्रामदैवत श्रीनागेश्वर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. शके ११४४ मध्ये या मंदिराची स्थापना झाली असल्याची आख्यायिका आहे. वैतरणा नदीच्या तीरावर उत्तराभिमुख असलेल्या मंदिराच्या परिसरात अनेक विविध प्रकारची झाडी आहेत. 

   पूर्वी हे मंदिर दुर्लक्षित होते त्यावेळी मंदिर परिसरात वेड्याबाबळीचे बन होते. व कही अतिशय उंच असलेले बूच झाडे होती. साधारण 1990 नंतर त्या वेळचे कृषी अधिकारी खबाले साहेब यांनी काही तरुणांना एकत्र करून श्रीनागेश्वर सेवा मंडळ निर्माण केले व तेथील बाभळी तोडून वेगवेगळे वृक्ष लागवड चालू केली. सुरुवातीला तेथे निलगिरीचे झाडे लावले होते परंतु ते झाडे त्या ठिकाणी आले नाहीत. नंतर नागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे व काही तरुणांनी येथे विविध प्रकारची झाडे लावली. मागील काही वर्षांपासून नदीपात्रात दशक्रिया चे कार्यक्रम होतात. तेथील नदीतील परिसर अतिशय अडचणीचा होता. तेथे वेड्या बाभळीचे झाडे होते. श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेडचे प्रशिक्षक बबलू टेकाळे यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तो परिसर स्वच्छ केला व तेथील बाभळी तोडून तेथे विविध प्रकारची झाडे लावली कोरोना लॉकडाऊन काळात त्यांनी या झाडांना पाणी घालण्यासाठी मंदिरापासून नदीतील झाडापर्यंत पाईपलाईन टाकली व ही झाडे जगवली नंतर या परिसरात कै अशोक गिरमे यांच्या स्मरणार्थ काही झाडे लावण्यात आली.

   सध्या येथे बूच, औदुंबर, पिंपळ, बेल, कवट, लिंब, रीठा, बकुळ, पॅथर्डीया, वड, अशोक,कांचन, चाफा,करंजी, नादुरकी, चिंच, पिंपरी, कासिद, सप्तपर्णी गुलमोहर व इतरही काही झाडे आहेत. या झाडांची बाबासाहेब खराडे, मिलिंद ब्रम्हे, महादेव पानसांडे, बबलू टेकाळे ही सर्व मंडळी वर्षभर निगा राखतात त्यामुळे हे ठिकाण नयनरम्य ठिकाण बनले आहे.
सध्या येथे गुलमोहर व बहावा या दोन्ही झाडांना फुलांचा बहर आला आहे मंदिरा शेजारी असलेले हे बहाव्याचे झाड सध्या पिवळ्या सोनेरी फुलांनी गजबजले आहे. हे मनमोहक झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बहावा हे झाड तसे हे क्वचितच दिसते जामखेड मध्ये तरी सध्या हे झाड श्रीनागेश्वर मंदिर येथेच पाहायला मिळते. या झाडांच्या फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष 'Golden shower tree' म्हणून ओळखला जातो. बहाव्याचे फुलोरे अर्धा हात लांब आणि लोंबणारे असतात. फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळ्या पण लांबलचक शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यात मऊ गरात दडलेली एक बी असते.

   जामखेड शहरासाठी श्री नागेश्वर मंदिर हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. हे मंदिर सोडता शहराच्या आसपास निवांत वेळ घालवण्यासारखे एकही ठिकाण नाही. त्यामुळे सहसा सकाळ संध्याकाळ जामखेडकर या मंदिराकडे दर्शनासाठी व विरंगुळा म्हणून आवर्जून जातात. व येथे आलेल्या भक्तांचे  हे झाड लक्ष वेधून घेत आहे. आलेला प्रत्येक भक्त त्या झाडाजवळ उभे राहून क्षणभर त्या सोनेरी फुलांचा मनमोराद आनंद घेतो. बरेच जण त्याचे फोटो काढतात व स्वतःच्या फोटो सोबत या फुलांनी बहरलेल्या झाडाचा सेल्फीही काढतात. एकूणच हे झाड येणाऱ्या भक्तांना क्षणभर आनंद दिल्याशिवाय राहत नाही.



Post a Comment

Previous Post Next Post