महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेडच्या सभापती पदाची निवड येत्या 16 मे रोजी होणार आहे. आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे या दोन्ही आमदारांनी या निवडणुकीला संपूर्ण ताकद लावली होती. मतदारांनी मात्र दोन्ही आमदाराला समान कौल दिला आहे. या निवडणुकीत भाजप 9 व राष्ट्रवादीचे 9 उमेदवार विजयी झालेले असल्यामुळे आता सभापती कोण याची उत्सुकता तालुक्यातील जनतेला लागली आहे.
कर्जत- जामखेड मतदार संघातील कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत व कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड या दोन्ही निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपाचे आमदार प्रा. राम शिंदे या दोन्ही आमदारांनी पॅनल उभे केले होते
. दोन्ही आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष होते. कर्जत बाजार समितीचे निकाल हाती आल्यानंतर त्या ठिकाणी दोन्ही पॅनलला नऊ नऊ अशा जागा मिळाल्या त्यानंतर जामखेडलाही त्याचीच पुनरावृत्ती झाली. जामखेड बाजार समितीत सुद्धा दोन्ही आमदारांना मतदारांनी समान कौल दिला. एकाच मतदारसंघातील दोन्ही बाजार समितीचा निकाल समान लागणे व दोन्ही ठिकाणी मतदारांनी दोन्ही आमदारांना समान कौल देणे ही आश्चर्यकारक बाब आहे.
या निवडणुकीत आ. रोहित पवार व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या सहकार व शेतकरी विकास पँनलचे सुधीर राळेभात, कैलास वराट, अंकुश ढवळे, सतिश शिंदे, रतन चव्हाण, अनिता शिंदे, नारायण जायभाय, राहुल बेदमूथा, सुरेश पवार हे नऊ उमेदवार विजयी झालेले आहेत. तर आ. प्रा. राम शिंदे व प्रा. सचिन गायवळ यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचे गौतम उतेकर, सचिन घुमरे, विश्वनु भोंडवे, गणेश जगताप, शरद कार्ले, वैजीनाथ पाटील नंदकुमार गोरे, सिताराम ससाणे, रविंद्र हुलगुंडे हे नऊ उमेदवार विजयी झाले आहेत
या निवडणुकीत दोन्ही पॅनलला समान जागा मिळाल्या मुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. मतमोजणी दिवशीच दोन्ही गटांनी आपापले विजयी उमेदवार सहलीसाठी पाठवले आहेत. 16 मे रोजी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक होणार आहे यावेळी आता कोणाची जादू चालते की शेवटी चिठ्ठी टाकून सभापती निवडण्याची वेळ येते याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
Tags
राजकीय