संत वामनभाऊंच्या दिंडीचे पहिले रिंगण जामखेड येथे उत्साहात संपन्न.

जामखेड प्रतिनिधी : संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे जामखेड शहरात सुमारे 20 हजार ते 25 हजार वारक-यासमवेत अत्यंत भक्तिमय वातावरणात आगमन झाले. यावेळी पहिले रिंगण जमादारवाडी जामखेड येथील संत वामनभाऊ महाराज गड येथे मंगळवारी दुपारी तीन वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री. विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 18 जून रोजी श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून संत वामनभाऊ महाराज यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. हा पालखी सोहळा याही वर्षी महंत विठ्ठल महाराज यांच्या अधिपत्याखाली मोठ्या थाटात अन् मोठ्या लवाजम्यासह प्रस्थान झाला आहे. या दिंडी सोहळ्याचे योग्य नियोजन आणि प्रयोजन करण्यात आले होते.
गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी,मातकुळी असा प्रवास करत मंगळवारी जांबवाडी येथे सकाळी दिंडी दाखल झाली. जामखेड शहरात आगमन होताच तपनेश्वर येथे विजय गदादे, डॉ ज्ञानेश्वर झेंडे, हभप हरिदास गुंड, संतोष बारगजे व भक्तांनी दिंडीचे स्वागत केले. जामखेड शहरातून ही भव्य दिंडी वाटचाल करत असताना दिंडीतील  श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे भजनी मोहन बुवा सुरवसे, मृदंगाचार्य बाळकृष्ण महाराज राऊत, श्रीहरी महाराज खेडकर, यांच्या सुश्राव्य अशा भजनाचा शहरातील भाविकांनी श्रवणाचा लाभ घेतला. ठिकठिकाणी वारकऱ्यांना आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक संस्थेकडून पायी दिंडी सोहळ्यातील वारकर्‍यांना मोफत उपचार व औषध वाटप करण्यात आले. तसेच शहरातील चेतन राळेभात, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जामखेड केमिस्ट संघटनेने फळे, चहा बिस्कीट,औषध , पाणी व्यवस्था केली होती.
शहरातील श्रीविठ्ठल मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर जगदाळेवस्ती येथे पंगत झाली नंतर जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिर येथे दुपारी दिंडीचे आगमन झाले. तेथे मानाचा अभंग झाला व रिंगण सोहळा सुरू झाला. मंदिराच्या भव्य प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला होता. पताकाधारी वारकरी, विणेकरी टाळ मृदंगाच्या तालावर पुंडलिक वरदे हरी विट्ठल …हा जय जयकार करत भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करू लागले. त्या पाठोपाठ दिंडीतील दोन अश्व धावू लागले. या अश्वांनी परिसरातून आलेल्या भाविकांची डोळ्याची पारणे फेडली. यावेळी भाविकांनी एकाच जय जयकार केला.

वारकरी परंपरेचे खेळिया प्रकरणातील अभंग झाले. या अभंगाच्या चालीवर अनेक महिला व पुरुष भक्तांनी फुगडीचा आनंद घेतला. यावेळी जमादारवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भागातून पंढरपूरला जाणारी संत वामनभाऊ महाराज यांची ही सर्वात मोठी दिंडी आहे. व या एकमेव दिंडीचे येथे रिंगण होते. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते. या दिंडीला अनन्य साधारण महत्व आहे.राज्यभरातून सुमारे 35 हजाराहून आधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे भोजन करून सारोळा येथे ही दिंडी मुक्कामी पोहोचली .

जाहिरात ⤵️

Post a Comment

Previous Post Next Post