जे कीर्तनकार कीर्तनाचा भाव स्वतः ठरवतात त्यांचे कीर्तने घेऊ नका- कैलास महाराज भोरे


श्रीनागेश्वर सप्ताहात आज हरी महाराज खुणे यांचे कीर्तन 


महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
" संतांना शरण गेल्याशिवाय, संत सहवास घडल्याशिवाय, किंवा संतांची कृपा झाल्याशिवाय भगवत प्राप्ती होत नाही. जे कीर्तनकार ठरवून पैसे घेतात किंवा कीर्तनाचा भाव ठरवतात व तुमच्या आमच्या पैशावर लाखो रुपयांच्या गाडीत फिरतात अशांची कीर्तने लोकांनी घेऊ नयेत "असे परखड मत ह.भ.प. कैलास महाराज भोरे यांनी मांडले. आज शुक्रवारी हरी महाराज खुणे पाथरुड यांचे कीर्तन होईल. 

श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त श्रीनागेश्वर पालखी सोहळा, शिवलीलामृत पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे श्रीनागेश्वर सेवा मंडळ व सप्ताह समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहामध्ये गुरुवारी नंदकुमार वांढरे गुरुजी यांचे प्रवचन झाले व सायंकाळी कैलास महाराज भोरे यांचे कीर्तन झाले. समितीच्या वतीने मिलिंद ब्रम्हे, शंकर राऊत, विनायक राऊत, यांनी महाराजांचे स्वागत केले.

तुम्ही संतजनी | माझी करा विनवणी ||
जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगावर चिंतन करत असताना कैलास महाराज भोरे यांनी प्रथम श्री नागेश्वर मंदिर येथे होत असलेल्या उत्सवाबाबत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले जामखेडला अनेक वेगवेगळ्या प्रकारे नागपंचमी साजरी केली जाते. परंतु काही निवडक लोकांनी श्रीनागेश्वर पालखी उत्सव सुरू केला. व त्याचबरोबर अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. त्यामुळे धार्मिक वृत्तीच्या लोकांना या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाली ही आनंदाची बाब आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीनागेश्वराचा यात्रा उत्सव पुढेही वर्षानुवर्ष चालू राहावा अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली. अभंगावर चिंतन करत असताना त्यांनी तुकोबारायांच्या भूमिकेतून देवाला प्राप्त करून घेण्याचा मार्ग अतिशय अतिशय सोप्या भाषेत उलगडून सांगितला ते म्हणाले या अभंगांमध्ये भगवान पांडुरंगाची भेट होत नाही अशी खंत तुकोबाराय व्यक्त करतात. आणि संतांजवळ विनवणी करतात. म्हणजेच संतांच्या जवळ गेल्याशिवाय, संतांना शरण गेल्याशिवाय, किंवा संतांची कृपा झाल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही हे यावरून सिद्ध होते. वारकरी संप्रदायात सध्या सुरू असलेल्या प्रथांवर त्यांनी प्रखर शब्दात आपले मत व्यक्त केले ते म्हणाले कीर्तनकारांनी अतिरेक करू नये. किर्तन झाल्यानंतर गावकऱ्यांनी स्वखुशीने दिलेले मानधन कीर्तनकारांनी स्वीकारावे व समाधानी राहावे. कमीत कमी मागणी करून किंवा स्वतः कीर्तनाचा भाव ठरू नये. आज जगद्गुरु तुकोबारायांचा एक एक अभंग पाठ असणारे लोक कीर्तनाचे मनाला वाटेल तसे पैसे घेतात. आणि लोकही त्यांना देतात आणि हे लोक तुमच्या जीवावर लाखोंच्या गाडीमध्ये आरामात फिरतात. माझा विषय वेगळा आहे मी कीर्तनाचे पैसे घेत नाही म्हणून मी बोलायला घाबरत नाही. आणि आज वारकरी संप्रदाय मध्ये आज कोणीतरी परखड बोलले पाहिजे. माझा कीर्तनकारांना एक सल्ला आहे कमीत कमी दिले तेवढ्यात समाधान मानावे अन्यथा गावोगावी होणारे अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम अडचणीत येतील. ते म्हणाले पूर्वी ९ ते ११ कीर्तने असायची मी संपूर्ण तालुक्यात सात ते नऊ कीर्तनाचा आग्रह धरला आणि नऊ नंतर आलेल्या सर्वांना महाप्रसाद अशी प्रथा सुरू केली. आज मला समाधान वाटत आहे. नागेश्वर सेवा मंडळाने हा सप्ताह सात ते नऊ ठेवला. जामखेड परिसरात व तालुक्यात बऱ्याच ठिकाणी सात ते नऊची प्रथा सुरू झाली आहे. व त्यामुळे किर्तनाला येणाऱ्या श्रोत्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावेळी कीर्तनाला मोठी गर्दी झाली होती. यावेळी सुदाम महाराज गायकवाड, ईश्वर महाराज तौर, दादासाहेब महाराज सातपुते, मृदंगाचार्य स्वप्निल महाराज खोरे, हरिदास महाराज गुंड, विठ्ठल भजनी मंडळ, श्रीनागेश्वर भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ, संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था, जगदाळे वस्ती भजनी मंडळ, बटेवाडी भजनी मंडळ व पंचक्रोशीतील भजनी मंडळींनी साथसंगत केली. 

शेवटी महाप्रसादाचे यजमान पोपट (नाना) राळेभात व सौ. योगीता पोपट राळेभात यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. व नंतर प्रसादाची पंगत झाली त्यावेळी एक ते दीड हजार भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.

आज शुक्रवारी दादासाहेब महाराज सातपुते यांचे साडेचार ते साडेपाच वाजता प्रवचन होईल व सायंकाळी ७ ते ९ ह भ प श्री. हरि महाराज खुणे यांचे कीर्तन होईल आजचे संत सेवेचे यजमान नगरसेवक दिगांबर चव्हाण आहेत. व महाप्रसादाचे यजमान अर्चना जाधव आहेत. 

श्रीनागेश्वर सप्ताह निमित्त येथे शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ह. भ. प. ईश्वर महाराज तौर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी १२१ पुरुष व महिला वाचक पारायणासाठी सहभागी झाले आहेत.


या संपूर्ण उत्सवासाठी श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, मिलिंद ब्रम्हे, विनायक राऊत, सिताराम राळेभात, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, संतोष बारगजे, दिलीप कुमार राजगुरू, पांडुरंग भोसले, महादेव पानसाडे, बबन सुर्यवंशी, किरण सोनवणे,नंदू शिंदे, प्रशांत काळे, सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे, ओम गुरव, श्री नागेश्वर भजनी मंडळाचे जगन्नाथ महाराज धर्माधिकारी(मेजर),शेषेराव मुरूमकर, त्र्यंबक वराट, मुरलीधर काळे, गिरधारीलाल ओझा, दत्तात्रय  म्हेेत्रे, संतोष राळेभात पाटील अहोरात्र अथक परिश्रम घेत आहेत.

 सप्ताहातील किर्तने
१६ ऑगस्ट ज्ञानेश्वरी महाराज बोराटे जामखेड 
१७ ऑगस्ट कैलास महाराज भोरे देवदैठण 
१८ ऑगस्ट हरी महाराज खुणे पाथरुड 
१९ ऑगस्ट अजिनाथ महाराज निकम शेवगाव 
२० ऑगस्ट अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले
२१ ऑगस्ट सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आत्माराम महाराज कुटे
२२ ऑगस्ट सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक परमेश्वर महाराज जायभाये, 
२३ ऑगस्टला रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. व शेवटी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.


श्रीनागेश्वर पालखी सोहळा
सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी
श्रीनागेश्वराची विधिवत पूजा होईल. नंतर पालखीमध्ये श्रीनागेश्वराचा मुखवटा ठेऊन ही पालखी रथात ठेवली जाईल. टाळ मृदुंगाच्या गजरात हरहर महादेवाच्या जयघोषात मिरवणुकीस सुरुवात होईल. श्रीनागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, संविधान चौक, श्री विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, महादेव गल्लीमार्गे ही दिंडी नव्याने झालेल्या वैतरणा नदीतील रस्त्याने श्रीनागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचेल नंतर आरती व महाप्रसाद होईल. दरम्यान, दिंडोरी प्रणीत श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी मंदिरासमोर होमहवन करतील. 

Post a Comment

Previous Post Next Post