श्रीनागेश्वर सप्ताहात आज अजिनाथ महाराज निकम शेवगाव यांचे कीर्तन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
"श्री नागेश्वर भगवान जामखेडचे ग्रामदैवत आहेत परंतु भगवान शंकर हे संपूर्ण विश्वाचे नाथ आहेत "असे ह.भ.प. हरी महाराज खुणे सांगितले. आज शनिवारी अजिनाथ महाराज निकम शेवगाव
यांचे कीर्तन होईल.
श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त श्रीनागेश्वर पालखी सोहळा, शिवलीलामृत पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे श्रीनागेश्वर सेवा मंडळ व सप्ताह समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहामध्ये शुक्रवारी दादासाहेब महाराज सातपुते यांचे प्रवचन झाले सायंकाळी ह.भ.प. हरी महाराज खुणे यांचे कीर्तन झाले. समितीच्या वतीने संत सेवेचे यजमान नगरसेवक दिगांबर चव्हाण यांनी महाराजांचे स्वागत केले.
तुम्ही विश्वनाथ | दिन रंक मी अनाथ ||
जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगावर चिंतन करत असताना हरी महाराज खुणे यांनी श्री नागेश्वर मंदिर येथे होत असलेल्या उत्सवाबाबत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले भगवान हे संपूर्ण विश्वाचे दैवत आहेत. जगद्गुरु तुकोबाराय यांनी काही यात्रेकरूं सोबत काशी विश्वेश्वराला पत्र लिहून विनंती केली की आमच्यावर कृपा करा आम्ही दिन आहोत तुम्ही विश्वनाथ आहात, तुमच्याजवळ काहीच कमी नाही, आणि आम्ही सुद्धा समाधानी आहोत, त्यामुळे आम्हाला काहीतरी प्रसाद म्हणून पाठवा व आमच्यावर कृपा असू द्या खुणे महाराज म्हणाले जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला दिन म्हणतात तो त्यांचा मोठेपणा आहे. देवासमोर आणि संतांसमोर जगद्गुरु तुकोबाराय यांनी कायमस्वरूपी लीनता स्वीकारली आहे. आपल्यासारख्या सर्व भक्तांनी याचा बोध घेतला पाहिजे आपणही देवासमोर आणि संतांसमोर कायमस्वरूपी लीन होऊन राहिले पाहिजे तरच आपला उद्धार होईल. असे म्हणून त्यांनी जामखेड वासियांचे आपले जुने संबंध असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी कीर्तनाला मोठी गर्दी झाली होती. यावेळी सुदाम महाराज गायकवाड, ईश्वर महाराज तौर, दादासाहेब महाराज सातपुते, पंढरीनाथ महाराज राजगुरू, मृदंगाचार्य स्वप्निल महाराज खोरे, हरिदास महाराज गुंड, विठ्ठल भजनी मंडळ, श्रीनागेश्वर भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ, संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था, जगदाळे वस्ती भजनी मंडळ, बटेवाडी भजनी मंडळ व पंचक्रोशीतील भजनी मंडळींनी साथसंगत केली.
शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर राळेभाग व नगरसेवक दिगंबर चव्हाण तसेच महाप्रसादाचे यजमान अर्चना जाधव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. व नंतर प्रसादाची पंगत झाली त्यावेळी भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.
आज शनिवारी महादेव महाराज रासकर यांचे साडेचार ते साडेपाच वाजता प्रवचन होईल व सायंकाळी ७ ते ९ ह भ प श्री.अजिनाथ महाराज निकम शेवगाव यांचे कीर्तन होईल आजचे आजचे संत सेवेचे यजमान समर्थ मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे संचालक डॉ. भरत दारकुंडे आहेत.
तर आजचे महाप्रसादाचे यजमान संजीवन मेंडकर आहेत.
श्रीनागेश्वर सप्ताह निमित्त येथे शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ह. भ. प. ईश्वर महाराज तौर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी १२१ पुरुष व महिला वाचक पारायणासाठी सहभागी झाले आहेत.
या संपूर्ण उत्सवासाठी श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, मिलिंद ब्रम्हे, विनायक राऊत, सिताराम राळेभात, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, संतोष बारगजे, दिलीप कुमार राजगुरू, पांडुरंग भोसले, महादेव पानसाडे, बबन सुर्यवंशी, किरण सोनवणे,नंदू शिंदे, प्रशांत काळे, सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे, ओम गुरव, श्री नागेश्वर भजनी मंडळाचे जगन्नाथ महाराज धर्माधिकारी(मेजर),शेषेराव मुरूमकर, त्र्यंबक वराट, मुरलीधर काळे, गिरधारीलाल ओझा, संतोष राळेभात पाटील अहोरात्र अथक परिश्रम घेत आहेत.
श्रीनागेश्वर पालखी सोहळा
सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी
श्रीनागेश्वराची विधिवत पूजा होईल. नंतर पालखीमध्ये श्रीनागेश्वराचा मुखवटा ठेऊन ही पालखी रथात ठेवली जाईल. टाळ मृदुंगाच्या गजरात हरहर महादेवाच्या जयघोषात मिरवणुकीस सुरुवात होईल. श्रीनागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, संविधान चौक, श्री विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, महादेव गल्लीमार्गे ही दिंडी नव्याने झालेल्या वैतरणा नदीतील रस्त्याने श्रीनागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचेल नंतर आरती व महाप्रसाद होईल. दरम्यान, दिंडोरी प्रणीत श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी मंदिरासमोर होमहवन करतील.
सप्ताहातील किर्तने
१६ ऑगस्ट ज्ञानेश्वरी महाराज बोराटे जामखेड
१७ ऑगस्ट कैलास महाराज भोरे देवदैठण
१८ ऑगस्ट हरी महाराज खुणे पाथरुड
१९ ऑगस्ट अजिनाथ महाराज निकम शेवगाव
२० ऑगस्ट अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले
२१ ऑगस्ट सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आत्माराम महाराज कुटे
२२ ऑगस्ट सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक परमेश्वर महाराज जायभाये,
२३ ऑगस्टला रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. व शेवटी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.
