नागेश्वराला जसा आवडतो, तसा उत्सव जामखेडकर करत आहेत : श्री आत्माराम महाराज शास्त्री

 

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : दि. 23 ऑगस्ट
श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त येथे होणारा उत्सव हा स्तुत्य आहे. जसा देवाला आवडतो, तसाच उत्सव तुम्ही सर्व ग्रामस्थ करत आहात. ही अतिशय चांगली बाब आहे, असे प्रतिपादन सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आत्माराम महाराज शास्त्री यांनी केले. 

  श्री नागेश्वर यात्रेनिमित्त श्री नागेश्वर पालखी सोहळा, शिवलीलामृत पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे श्री नागेश्वर सेवा मंडळ व सप्ताह समितीतर्फे आयोजित करण्यात आला. या उत्सवात सोमवारी नागेश्वर पालखी सोहळ्यानिमित्ताने नागपंचमीच्या दिवशी सायंकाळी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आत्माराम महाराज शास्त्री यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी संत सेवेचे यजमान मंगलताई जोरे यांच्या वतीने महाराजांचे स्वागत करण्यात आले. 

(फोटो - यजमान मंगल ताई जोरे यांना महाराजांच्या हस्ते श्रीफळ देण्यात आले

  यावेळी आत्माराम महाराज शास्त्री यांनी कीर्तनासाठी संत नरहरी सोनार यांचा 
“भस्म उटी रुंड माळा। 
हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा ॥” 
हा अभंग निवडला. या अभंगातून त्यांनी भगवान शंकराच्या रुपाचे अतिशय सुंदर वर्णन केले. शास्त्री महाराज म्हणाले, भगवान शंकर भोळे दैवत आहेत. भगवान शंकर वैष्णव आहेत. म्हणून नागेश्वर मंदिराच्या दरबारामध्ये यात्रेनिमित्त वारकरी परंपरेनुसार होणारा उत्सव हा भगवान शंकराला प्रिय आहे. त्यातच आज श्रावणी सोमवार आणि त्याचबरोबर नागपंचमी हा जामखेडचा महत्त्वाचा उत्सव. म्हणून मी मुद्दाम आज हा अभंग घेतला. नाग ही स्वतंत्र देवता आहे. नागनाथ, नागेश्वर, नागेंद्र ही भगवान शंकराची नावे आहेत. जे नागांचे नाथ आहेत ते नागनाथ. जे नागांचे ईश्वर आहेत ते नागेश्वर आणि जे नागांचे इंद्र आहेत म्हणजेच नागांचे स्वामी, ते नागेंद्र. त्यामुळे आज संपूर्ण नागांचे ईश्वर असणारे नागेश्वर यांचे दर्शन होणे म्हणजे संपूर्ण नागांचे दर्शन. आज नागपंचमीनिमित्ताने तुम्हाला व मला होत आहे, हे आपले सर्वांचे भाग्य आहे. भगवान शंकरांनी ज्या वेळेला हलाहल नावाचे विष प्राशन केले. त्यावेळेला त्यांना खूप त्रास होऊ लागला. चंद्र शीतल आहे, म्हणून भगवान शंकरांनी चंद्र डोक्याला लावला. हिमालय थंड आहे म्हणून हिमालयात जाऊन बसले व सर्प थंड आहे म्हणून संपूर्ण अंगावर सर्प म्हणजेच नाग धारण केले. कंठात विष होते व ते त्रास देत होते. भगवान शंकराच्या हृदयात राम होते, म्हणून त्यांनी ते विष कंठाच्या खाली जाऊ दिले नाही. त्याचा त्रास होत होता शेवटी त्यांनी राम नामाचे भजन सुरू केले आणि त्यांचा दाह कमी झाला. 

(फोटो - जामखेड ग्रामस्थांच्या वतीने आत्माराम शास्त्री महाराज यांचा सन्मान करताना प्रा.मधुकर राळेभात .

  आत्माराम शास्त्री म्हणाले, वारकरी संप्रदायामध्ये जितके महत्त्व विठ्ठल पूजेला आहे, तितकेच महत्त्व भगवान शंकराच्या पूजेला आहे. एकादशी व्रत करणार्‍यांसाठी सोमवारी सुद्धा व्रत करणे बंधनकारक आहे. पूर्वी हरी आणि हर यामध्ये भेद मानला जायचा. परंतु, वारकरी संप्रदायातील संतांनी हा भेद संपून टाकला. असे सुंदर वर्णन करताना शास्त्री महाराजांनी जामखेडच्या होत असलेल्या श्री नागेश्वर पालखी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह आयोजकांचे मनापासून कौतुक केले.

  यावेळी कीर्तनाला मोठी गर्दी झाली होती. शेवटी संत सेवेचे यजमान मंगलताई जोरे यांच्यातर्फे आत्माराम महाराज शास्त्रींचा सन्मान करण्यात आला. महाप्रसादाचे यजमान पन्हाळकर अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुशील विष्णुपंत पन्हाळकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. नंतर प्रसादाची पंगत झाली.

  कीर्तनावेळी सुदाम महाराज गायकवाड, ईश्वर महाराज तौर, दादासाहेब महाराज सातपुते, पंढरीनाथ महाराज राजगुरू, मृदंगाचार्य स्वप्निल महाराज खोरे, हरिदास महाराज गुंड, विठ्ठल भजनी मंडळ, श्री नागेश्वर भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ, संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था, जगदाळे वस्ती भजनी मंडळ, बटेवाडी भजनी मंडळ व पंरिसरातील भजनी मंडळींनी साथसंगत केली.

  या संपूर्ण उत्सवासाठी श्री नागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, मिलिंद ब्रम्हे, विनायक राऊत, सिताराम राळेभात, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, संतोष बारगजे, दिलीपकुमार राजगुरू, पांडुरंग भोसले, महादेव पानसाडे, बबन सूर्यवंशी, किरण सोनवणे, नंदू शिंदे, प्रशांत काळे, सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे, ओम गुरव, श्री नागेश्वर भजनी मंडळाचे जगन्नाथ महाराज धर्माधिकारी (मेजर), शेषेराव मुरुमकर, त्र्यंबक वराट, मुरलीधर काळे, गिरधारीलाल ओझा, संतोष राळेभात आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post