श्रीनागेश्वर सप्ताहात आज प्रकाश महाराज बोधले यांचे कीर्तन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
" थोड्याशा भक्तीवर पावणारा देव म्हणजे महादेव तो भोळा आहे आणि एखाद्या भक्ताने जर थोडी सेवा केली तर तो सहजरित्या प्रसन्न होतो. आणि देवाला भक्ताने जे मागितले तेही तो सहजपणे देऊन टाकतो "असे प्रतिपादन ह.भ.प. अजिनाथ महाराज निकम यांनी केले. आज रविवारी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांचे कीर्तन होईल.
श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त श्रीनागेश्वर पालखी सोहळा, शिवलीलामृत पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे श्रीनागेश्वर सेवा मंडळ व सप्ताह समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहामध्ये शनिवारी रासकर महाराज यांचे प्रवचन झाले सायंकाळी ह.भ.प. अजिनाथ महाराज निकम यांचे कीर्तन झाले. समितीच्या वतीने संत सेवेचे समर्थ मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे संचालक डॉ. भरत दारकुंडे यांनी महाराजांचे स्वागत केले.
भक्ताविना देवा | कैसे रूप घडे सेवा ||
जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगावर चिंतन करत असताना अजिनाथ महाराज निकम यांनी देव आणि भक्त यांच्यातील भाव प्रगट करण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले जामखेडला श्री नागेश्वराचे इतके प्राचीन मंदिर आहे की ज्याची स्थापना शके 1144 मध्ये झाली जामखेडकर खरोखरच भाग्यवान आहेत की इतके सुंदर महादेवाचे मंदिर येथे आहे. आणि जामखेडकर या देवताची मनापासून सेवा करतात व उत्सव साजरा करतात हा देव सर्वांना भरभरून देतो. पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर देवस्थानाची ही यावेळी महाराजांनी खूप छान माहिती सांगितली व अभंग वर चिंतन केले.
यावेळी कीर्तनाला मोठी गर्दी झाली होती. यावेळी सुदाम महाराज गायकवाड, ईश्वर महाराज तौर, दादासाहेब महाराज सातपुते, पंढरीनाथ महाराज राजगुरू, मृदंगाचार्य स्वप्निल महाराज खोरे, हरिदास महाराज गुंड, विठ्ठल भजनी मंडळ, श्रीनागेश्वर भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ, संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था, जगदाळे वस्ती भजनी मंडळ, बटेवाडी भजनी मंडळ व पंचक्रोशीतील भजनी मंडळींनी साथसंगत केली.
शेवटी यजमान समर्थ मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत दारकुंडे.
तसेच महाप्रसादाचे यजमान संजीवन मेंडकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. व नंतर प्रसादाची पंगत झाली त्यावेळी भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.
आज रविवारी आदर्श शिक्षक मनोहर महाराज इनामदार सर यांचे साडेचार ते साडेपाच वाजता प्रवचन होईल व सायंकाळी ७ ते ९ अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांचे कीर्तन होईल. जामखेडचे सुप्रसिद्ध उद्योजक रमेश अजबे हे रविवारचे संत सेवेचे यजमान आहेत. तर महाप्रसादाचे यजमान काजल जाधव या आहेत.
श्रीनागेश्वर सप्ताह निमित्त येथे शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ह. भ. प. ईश्वर महाराज तौर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी १२१ पुरुष व महिला वाचक पारायणासाठी सहभागी झाले आहेत.
या संपूर्ण उत्सवासाठी श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, मिलिंद ब्रम्हे, विनायक राऊत, सिताराम राळेभात, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, संतोष बारगजे, दिलीप कुमार राजगुरू, पांडुरंग भोसले, महादेव पानसाडे, बबन सुर्यवंशी, किरण सोनवणे,नंदू शिंदे, प्रशांत काळे, सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे, ओम गुरव, श्री नागेश्वर भजनी मंडळाचे जगन्नाथ महाराज धर्माधिकारी(मेजर),शेषेराव मुरूमकर, त्र्यंबक वराट, मुरलीधर काळे, गिरधारीलाल ओझा, संतोष राळेभात पाटील अहोरात्र अथक परिश्रम घेत आहेत.
श्रीनागेश्वर पालखी सोहळा
सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी
श्रीनागेश्वराची विधिवत पूजा होईल. नंतर पालखीमध्ये श्रीनागेश्वराचा मुखवटा ठेऊन ही पालखी रथात ठेवली जाईल. टाळ मृदुंगाच्या गजरात हरहर महादेवाच्या जयघोषात मिरवणुकीस सुरुवात होईल. श्रीनागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, संविधान चौक, श्री विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, महादेव गल्लीमार्गे ही दिंडी नव्याने झालेल्या वैतरणा नदीतील रस्त्याने श्रीनागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचेल नंतर आरती व महाप्रसाद होईल. दरम्यान, दिंडोरी प्रणीत श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी मंदिरासमोर होमहवन करतील.
सप्ताहातील किर्तने
१६ ऑगस्ट ज्ञानेश्वरी महाराज बोराटे जामखेड
१७ ऑगस्ट कैलास महाराज भोरे देवदैठण
१८ ऑगस्ट हरी महाराज खुणे पाथरुड
१९ ऑगस्ट अजिनाथ महाराज निकम शेवगाव
२० ऑगस्ट अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले
२१ ऑगस्ट सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आत्माराम महाराज कुटे
२२ ऑगस्ट सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक परमेश्वर महाराज जायभाये,
२३ ऑगस्टला रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. व शेवटी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.