महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जामखेड मध्ये सकाळी मूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी बघायला मिळाली. शहरात आज सकाळी मंगलमय वातावरण दिसत होते. जिकडे तिकडे गणपती मुर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्याची लगबग दिसत होती.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्रीगणेश चतुर्थी या दिवशी संपूर्ण देशात व महाराष्ट्रात श्रीगणेश मूर्ती स्थापन करून वेगवेगळ्या प्रांतानुसार गणपतीची आराधना केली जाते. खास करून महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह अन्य शहरात सुद्धा मोठ्या उत्साहात सार्वजनिक उत्सव गणेश उत्सव साजरे केले जातात. गाव व खेड्यात सुद्धा सार्वजनिक तसेच घरोघर गणेश मूर्तींची स्थापना केली जाते.
जामखेड तालुक्यात आज मंगळवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच गणेश मूर्ती खरेदी करण्यास आलेल्या नागरिकांची गर्दी पाहायला मिळत होती. दरवर्षी जामखेड शहरातील जय हिंद चौक येथे गणेश मूर्तींचे स्टॉल लागले जात असत. यावर्षी नगर परिषदेने जुने तहसील व पंचायत समितीच्या कार्यालयासमोरील ल. ना. होशिंग विद्यालयाच्या रस्त्याला दोन्ही बाजूंनी श्रीगणेश मूर्तींचे स्टॉल लागले होते. त्यामुळे आज लोकांना निवांत गणेश मूर्ती खरेदीचा आनंद घेता आला व या निर्णयामुळे जय हिंद चौक या वर्दळीच्या रस्त्याला मोकळा श्वास घेता आला. गणेश मूर्ती सोबतच सजावट करण्यासाठी लागणारे साहित्य दुर्वा, श्रीफळ, नागिणीचे पान, हार, फुले, अगरबत्ती कापूर या साहित्याची सुद्धा आज येथे मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे आढळून आले. बहुतांशी शेतकरी दूर्वा घेऊन विक्रीसाठी बसलेली दिसत होते.
छोट्या छोट्या मूर्ती पासून भव्य मोठ्या आकारांच्या मूर्ती सुद्धा या स्टॉलवर दिसत होत्या त्याचबरोबर काही पर्यावरण प्रेमी मातीच्या किंवा शाडूच्या मूर्ती घेताना दिसत होते. मूर्ती खरेदी केल्यानंतर मोठ्या उत्साहात वाजत गाजत घरी नेऊन विधीवत पूजा करून आज जामखेड शहर व तालुक्यात विधिवत श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. पुढील दहा दिवस संपूर्ण शहरामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, सजावट श्रीगणेश भक्ती गीतांनी जामखेड नगरी दुमदुमून गेली आहे. एकूणच श्री गणेश उत्सव हा उत्साहात साजरा होताना दिसत आहे.