संततधार पावसामुळे जामखेडकर सुखावले

संततधार पावसामुळे जामखेडकर सुखावले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
 गौरी गणपतीचे आगमन होताच जामखेड शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काहीशी दूर होणार आहे. 

चालू वर्षी पावसाळा जवळपास कोरडाच गेल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकरी चिंतेत असल्यास संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडते. तालुक्यात अनेक ठिकाणी अजूनही पाण्याची टंचाई आहे. जून जुलै ऑगस्ट या तीनही महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. श्रावण महिना ही जवळजवळ कोरडाच गेला. त्यामुळे दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पूर्ण क्षमतेने पाऊस न झाल्यास तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होणार आहे. 

जामखेड तालुक्यातील शेती ही संपूर्णतः पावसावर विसंबून असते. त्यातच यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळजवळ वाया गेल्यासारखा आहे.

बुधवार गुरुवार व शुक्रवार तीनही दिवस तालुक्यात ठीक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा थोड्याशा पल्लवीत झाल्या आहेत. काही अंशी तग धरून असलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. त्याचबरोबर चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. परंतु संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी अजून भरपूर पाऊस पडण्याची गरज आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाहीत तर मात्र तालुक्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post