महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
जामखेड शहरासाठी वरदान ठरलेला भुतवडा तलाव आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरला आहे. संपूर्ण जामखेड शहराला भुतवडा तलावातून पाणीपुरवठा होत आहे. तलाव भरल्यामुळे शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तलाव भरल्यामुळे जामखेड शहरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
चालू वर्षी आतापर्यंत पावसाळा जवळपास कोरडाच गेल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकरी चिंतेत असल्यास संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडते. तालुक्यात अनेक ठिकाणी अजूनही पाण्याची टंचाई आहे. जून जुलै ऑगस्ट या तीनही महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. श्रावण महिना ही जवळजवळ कोरडाच गेला.
जामखेड तालुक्यातील शेती ही संपूर्णतः पावसावर विसंबून आहे. त्यातच यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळजवळ वाया गेल्यासारखा आहे.
गौरी गणपतीचे आगमन होताच जामखेड शहर व तालुक्यात गेल्या चार पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काहीशी दूर होणार आहे.
मंगळवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार तीनही दिवस तालुक्यात ठीक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. शनिवारी मात्र दिवसभर या परिसरात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
शनिवारच्या पावसामुळे सौताडा धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेले बंधारे भरून वाहू लागले व पावसाचा जोरही चांगला असल्यामुळे विंचरणा नदीतून झालेल्या जोरदार प्रवाहामुळे भुतवडा तलाव रात्रीतून पूर्ण क्षमतेने भरला.
आज सकाळी आठ वाजल्यापासून भुतवडा तलावाच्या सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली झाली. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या विंचरणा नदीलाही आज पाण्याच्या प्रवाहात वाढ झालेली दिसत आहे.
जामखेड शहरातील नागरिक हवालदिल झाले आहेत होते. मात्र आज भरलेल्या भुतवडा तलावामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ातची चिंता संपली असून शहरवासीयांना मोठा आनंद झाला आहे.