आपल्याला त्रास देणाऱ्याचे घर उन्हात बांधू- पंकजाताई मुंडे

(सर्व छायाचित्रे शरद गर्जे आष्टी) 

    भगवान भक्तीगड : दुसऱ्या पक्षात जाण्याएवढी मी लेची पेची नाही. मागच्या वेळेस माझा पराभव झाला. राजकारणामध्ये एखादा पराभव होत असतो. मात्र  आता पराभव नाही तर चारित्र्यहीन नेत्यांना पराभूत करणार. माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही. मी दुसऱ्याच्या मेहनतीचे खाणार नाही. आपल्याला त्रास देणाऱ्याचे घर उन्हात बांधू. आता माझी माणसं संयम दाखवणार नाहीत. अशी सिंहगर्जना लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी दसरा मेळाव्यात भगवान भक्ती गडावरून केली. 

      दर वर्षीप्रमाणे पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळावा संपन्न झाला यावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जमलेल्या लाखोंच्या जनसमुदायास संबोधित केले. यावेळी खासदार प्रितम मुंडे यशश्री मुंडे खासदार सुजय विखे पाटील आमदार सुरेश धस आमदार मोनिका राजळे आमदार शिवाजी कर्डिले. आ. नमिता मुंदडा, विजय गोल्हार यांच्यासह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. पंकजाताई दसरा मेळाव्याला काय भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. पंकजाताईंनी आज अतिशय खंबीरपणे भूमिका मांडली. 

    यावेळी पंकजाताई मुंडे म्हणाल्या " प्रितमताई घरी बसणार नाहीत आणि दुसऱ्याच्या मेहनतीचं मी खाणार नाही. मागील निवडणुकीत माझा पराभव झाला. म्हणून काय झालं? राजकारणात कधीतरी पराभव होत असतो. पडले तर पडले. कोण पडत नाही? ब्रह्मा, विष्णू, महेश सुद्धा युद्धांमध्ये हरले. भैरवांनी तर ब्रह्माचं एक शीर छाटून टाकलं.
शिवाला सुद्धा हनुमानासमोर युद्ध करताना नतमस्तक व्हावं लागलं. भगवान विष्णुला सुद्धा संकटाला सामोरं जावं लागलं. या देवांना संकट आहे. देवीला सुद्धा लाखो असुरांसोबत युद्ध करावं लागल. आपण युद्धाला का तयार राहणार नाही ?", असा सवाल पंकजाताईंनी यावेळी केला.

    माझा पाय मोडला तर मला कुबड्या घेऊन चालावं लागेल की नाही ? या कुबड्या एक तर मला पार्टी देऊ शकते किंवा जनता देऊ शकते. माझ्या जनतेने मला एवढ्या कुबड्या दिल्या की दोन महिन्यात मला मॅरेथॉन स्पर्धेत धावण्याची ताकद तयार झाली"

    "मी मनाने कधीच खचले नाही. मला कधीच वाटलं नाही की काही कमी आहे. मला एकच वाटलं की, तुमच्या सेवेत खंड आला. हात जोडून मी माफी मागते. दरवेळी तुम्हाला वाटतं, आमची ताई अमूक, आमची ताई तमूक, पण दरवेळी तुमची अपेक्षाभंग होते. मी जेव्हा दोन महिन्याची रजा घेतली. माझ्यामध्ये फक्त नीतीमत्ता आहे.
गोपीनाथ मुंडेंची लेक म्हणून हिंमत आणि माझ्या लोकांवरचा असलेला विश्वास”

    "माझ्यावर रोज आरोप होतो. कुणी म्हणतं ताई या पक्षात चालल्या, कुणी म्हणतं ताई त्या पक्षाच चालल्या, कुणी म्हणतं आम्हाला असं कळलं, कुणी म्हणतं आम्हाला तसं कळलं, पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही.दहा वेळा यांचे स्वप्न तुटले. तरी यांच्या डोळ्यात एक नवीन स्वप्न परत जन्म घेत आहेत", अशी भूमिका पंकजाताई मुंडे यांनी मांडली.

    भगवान बाबांनी आपल्यावर सावली धरली. आता आपल्याला त्रास देणाऱ्याचं घर ऊन्हात बांधू. आता माझी माणसं ऊन्हात राहणार नाहीत. आता माझी माणसं संयम दाखवणार नाहीत. आता माझी माणसं भगवान शिवाचं रुप आहेत. शिवशंकर खूप भोळा आहे. पण त्याला सुद्धा तिसरा डोळा आहे" असी संतप्त भावना पंकजाताई मुंडे यांनी मांडली .

यावेळी बीड नगर जिल्ह्यातील आमदार विविध पक्षातील कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post