पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ विकासासाठी आ.रोहित पवार यांनी मंजूर केलेल्या कोट्यवधींच्या कामांचा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार भूमिपूजन सोहळा


जयंत पाटील, सुषमा अंधारे, विश्वजीत कदम यांच्यासह युवराज भूषणसिंह राजे होळकर देखील राहणार उपस्थित


जामखेड प्रतिनिधी | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आमदार रोहित पवार यांनी आमदार झाल्यापासूनच महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधींची विकास कामे मंजूर करून आणली होती. परंतु, राज्य शासनाने विविध कामांवर स्थगिती लावली होती. परंतु त्यानंतर न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतर ती कामे सुरू करण्यासंदर्भात हिरवा कंदील मिळाला. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ विकासासाठी आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी वेळोवेळी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करून कोट्यवधींची विकास कामे मंजूर करून आणली आहेत. त्यापैकीच जवळपास ७ कोटींच्या कामांचे भव्य भूमिपूजन गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत चौंडी येथे पार पडणार आहे.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मस्थळी संग्रहालय बांधकाम, जन्मस्थळी असलेल्या नदीकाठी घाटाचे बांधकाम व सुशोभीकरण करणे त्याबरोबरच जन्मस्थळी दोन भव्य मोठ्या स्वागत कमानीचे बांधकाम अशा तब्बल ७ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन चौंडी येथे पार पडणार आहे. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज युवराज भूषणसिंह राजे होळकर, माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, माजी मंत्री,आ.विश्वजीत कदम साहेब व शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता हा भूमिपूजन सोहळा शासकीय विश्रामगृहाशेजारील मैदान चौंडी येथे पार पडणार असून त्यावेळी सभेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. 

आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ चौंडी येथे जिल्हा परिषद शाळा बांधकाम करण्यासाठी दोन कोटी तीन लाख व सीना नदीवर पश्चिम घाटाचे बांधकाम करण्यासाठी ४ कोटी ९९ लाख अशी कोट्यावधींची विकास कामे मंजूर करून आणली आहेत. त्यानंतर आता आणखी ७ कोटींच्या विकासकामांचे भव्य दिव्य असे भूमिपूजन चौंडी येथे केले जाणार आहे. 

सर्व कर्जत-जामखेड मधील नागरिक, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी व युवा वर्गाने या भूमिपूजन सोहळ्याला व सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे. यासोबतच चौंडी येथून युवा संघर्ष पदयात्रेच्या देखील पुढच्या टप्प्याला सुरुवात होणार असून पुणे ते नागपूर अशा पदयात्रेच्या पुढील टप्प्याला देखील सुरुवात केली जाणार आहे. त्यानुसार आता यात्रा चौंडी येथून पुन्हा एकदा सुरू होऊन ती यात्रा नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान धडकणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post