महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
पिढ्यांना पिढ्या ज्यांना स्वतःचे घर नाही. त्यामुळे ते पालात राहतात. घराचा निवारा त्यांना माहीतच नाही. अशा मदारी समाजासाठी मागील नऊ वर्ष संघर्ष करून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे भटक्या विमुक्त जाती जमातीचे राज्य समन्वयक ॲड.डाॅ.अरुण जाधव यांच्या प्रयत्नाला अखेर यश मिळाले आहे. त्यामुळे खर्डा येथील मदारी समाजाला हक्काचे घर मिळणार असून या घरकुल योजनेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते नुकताच पार पडला.
जामखेड तालुक्यातील खर्डा या ऐतिहासिक गावात मदारी समाज वास्तव्य करत आहे. आजवर त्यांना स्वतःच्या हक्काचे घर नव्हते. त्यामुळे हा समाज मिळेल त्या जागेत पालामध्ये राहत होता. परंतु भटक्या विमुक्त जाती-जमातीचे कैवारी तथा भटक्या विमुक्त जाती जमातीचे राज्य समन्वयक ॲड.डाॅ.अरुण जाधव यांनी या समाजाच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष दिले. व शासन स्तरावर मागणी करून पूर्ण ताकतीने या योजनेसाठी पाठपुरावा केला अनेक आंदोलने केली शासकीय स्तरावर आज या योजनेची जवळजवळ पूर्ण तयारी झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरच मदारी समाजाला स्वतःचे हक्काचे घर मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
खर्डा येथे 2015 साली भटक्या विमुक्त जाती जमातीचे राज्य समन्वयक अँड अरुण जाधव यांच्या संकल्पनेतून खर्डा येथील वर्षानुवर्षे झोपडीत राहणाऱ्या मदारी समाजासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत त्यांनी राज्य सरकारकडून घरे मंजूर करून आणली होती. या वसाहतीसाठी ग्रामपंचायतने जागाही उपलब्ध केली होती, परंतु काही कारणास्तव सदर जागेत दोन वेळा बदल करण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायतीला जागेचा नकाशा व इतर बाबी पूर्ण करण्यासाठी पहिल्यापासून सुरुवात करावी लागली.
त्यामुळे मदारी समाजाचा घरकुलांचा प्रश्न वर्षानुवर्षी पुढे ढकलत होता. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अँड अरुण जाधव हे सातत्याने मोर्चा, उपोषण किंवा रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत होते. या घरकुल योजनेला नऊ वर्षापासून शासन मंजूरी असून देखील अपुऱ्या कागदपत्रांमुळे घरकुलाचा प्रश्न मार्गी लागत नव्हता.
याबाबत खर्डा ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. संजीवनीताई पाटील यांनी पुढाकार घेऊन सातत्याने गट विकास अधिकारी प्रकाश पोळ व तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे पाठपुरावा करून ही योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. अखेर दिनांक 7 डिसेंबर रोजी मदारी समाजाच्या घरकुल बांधकामाचा प्रत्यक्षात शुभारंभ करण्यात आल्याने मदारी समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यासाठी खर्डा ग्रामपंचायत ने कानिफनाथ मंदिराजवळ एक हेक्टर जागा दिली आहे, या योजनेतील वीस घरकुलांचे बांधकाम होणार असून पुढील काळात 28 घरकुल मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत असे समजते
सदर योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून होणार आहे.या वसाहतीच्या मध्ये रस्ते, पिण्याची पाण्याची सोय, नवीन गटार बांधकाम, लाईट व्यवस्था व सुशोभीकरण अशा प्रकारच्या सोयी या वसाहतीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे मदारी घरकुल वसाहत ही आगामी काळात जिल्ह्याला दिशादर्शक ठरेल असे बांधकाम करून एक आदर्श वसाहत म्हणून त्याचा उल्लेख करावा लागेल अशा प्रकारचे नियोजन खर्डा ग्रामपंचायत,ग्रामस्थ व आधिराऱ्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
या घरकुल वसाहत योजनेच्या बांधकामाचा शुभारंभ प्रसंगी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रकाश पोळ ,विस्तार अधिकारी कैलास खैरे , माजी उपसभापती रवि सुरवसे, सरपंच वैजिनाथ पाटील, माजी सरपंच आसाराम गोपाळघरे, संजय गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, महेश दिंडोरे, श्रीकांत लोखंडे, महालिंग कोरे, मनोज भोरे, विशाल पवार, गणपत कराळे, दादासाहेब दाताळ, बिभीषण परकड, राहुल पवार, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, सलीम मदारी, हुसेन मदारी, सरदार मदारी, फकीर मदारी इत्यादी सह मुस्लिम मदारी समाजाचे कार्यकर्ते व खर्डा ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
सतत पाठपुरावा करून नऊ वर्ष संघर्ष केला.या संघर्षाला अखेर यश मिळाले.मदारी समाजाला हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- ॲड. डॉ.अरुण जाधव