34 वी राज्यस्तरीय सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा जळगाव येथे उत्साहात सुरू
राज्यातून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात 550 खेळाडूंची उपस्थिती.
जळगाव : भारतीय तायक्वांदो महासंघ TFI हीच संस्था भारत देशात सर्वोच्च संस्था आहे. भारतीय ऑलम्पिक संघटना IOA, शालेय खेळ महासंघ SGFI व भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालय या सर्व मान्यता असलेली तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया ही एकमेव संघटना आहे. त्यामुळे आज जळगाव येथे होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून जे खेळाडू निवडले जातील ते थेट TFI मान्यतेने हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत सहभागी होतील. महाराष्ट्रातील तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई शिवाय अन्य कोणत्याही संघटनेच्या खेळाडुंना तेथे भाग घेता येत नाही, असे प्रतिपादन तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई चे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांनी केले.
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे 34 वी राज्यस्तर तायक्वांदो स्पर्धेचे जैन इरिगेशन सिस्टीमचे मीडिया प्रमुख श्री अनिल जोशी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, तर व्यासपीठावर जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेश कर्रा, उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील उपस्थित होते. यावेळी जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव अजित घारगे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
या स्पर्धेसाठी 26 जिल्ह्यातील जवळपास 550 खेळाडू सहभागी झाले आहेत. जैन इरिगेशन सिस्टीमचे मीडिया प्रमुख श्री अनिल जोशी आपल्या भाषणात म्हणाले की "विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होईल आणि आपला आमदार निवडला जाईल. तसेच सध्या सुरू असलेल्या या तायक्वांदो स्पर्धेत तुम्ही खेळून जिंकाल तेव्हा मैदानावरचे खरे आमदार तुम्ही असाल असे व्यक्तव्य या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून लाभलेले श्री जोशी यांनी करत खेळाडूंचे मनोबल वाढवले आहे.
महाराष्ट्र राज्यातील एकूण 26 जिल्ह्यातून सहभागी झालेल्या या खेळाडू मधुन 28 वजन गटात प्रत्येकी एक प्रथम क्रमांक निवडला जाईल तर प्रथम क्रमांकाचे सर्व खेळाडू दिनांक 29 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर दरम्यान पंचकुला हरियाणा येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करतील.
जिल्हा क्रीडा संकुलात दिनांक 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धा सुरू राहणार असून या स्पर्धा तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांनी आयोजित केले असल्याचे आयोजक श्री घारगे यांनी प्रसिद्धी देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. यावेळी अहिल्यानगर जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव संतोष बारगजे यांनी सुत्रसंचलन केले. तर जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव अजित घारगे यांनी आभार मानले.
या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महेश घारगे, जयेश बावीस्कर, पुष्पक महाजन, यश शिंदे, निकिता पवार, सिमरन बोरसे, रोहन लोणारी, पुर्वा चौधरी, दानिश तडवी, भुषण मगरे हे सर्व अथक परिश्रम घेत आहेत.
