बस मध्ये हरवलेला मोबाईल वाहकाच्या तत्परतेमुळे प्रवाशाला मिळाला परत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क :
बीड - पुणे बस मध्ये हरवलेला मोबाईल वाहकाच्या प्रामाणिकपणामुळे व तत्परतेमुळे प्रवाशाला परत मिळाला. 

सोमवारी सकाळी शिवाजीनगर आगाराची ॉMH-06 S- 8343  ही बस बीड बस स्थानकावरून पुण्याला निघाली या गाडीत खडकवाडी येथील दिपक जायभाये हे वाहक म्हणून सेवा करत होते. गाडीमध्ये धुमाळ मेजर हे प्रवासी बसले होते त्यांना स्वतःचा मोबाईल खिशात नसल्याचे कळल्यानंतर त्यांनी बस थांबवण्याची विनंती केली व बीड शहरातून बस बाहेर निघण्यापूर्वीच ते बसमधून आपल्या मोबाईलच्या शोधासाठी बीड बस स्थानकाचा दिशेने परत गेले. त्यानंतर काही वेळाने धुमाळ मेजर यांच्या मोबाईलवर त्यांच्या मुलीचा फोन आला. एका प्रवासाने मोबाईलची रिंगटोन ऐकली व ते बसलेल्या बाकाखाली मोबाईल पडला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या प्रवाशाने वाहक श्री. जायभाये यांना सांगितले येथे कुणाचा तरी मोबाईल पडला आहे. वाहक श्री. जायभाये यांच्या लगेच लक्षात आले की धुमाळ मेजर हे प्रवासी मोबाईलच्या शोधासाठी बस मधुन खाली उतरून गेले होते हा मोबाईल त्यांचाच असावा. 

ज्या नंबर वरून फोन आला होता त्या नंबर वर श्री. जायभाय यांनी स्वतःच्या फोनवरून परत फोन केला तो फोन नंबर धुमाळ मेजर यांच्या मुलीचा होता. त्यांनी सांगितले की माझे वडील तुमच्या गाडीत प्रवास करत आहेत त्यांचा हा मोबाईल आहे. त्यावर श्री. जायभाये यांनी त्यांना हकीगत सांगितली की तुमचे वडील मोबाईल हरवला असे समजून ते गाडीतून खाली उतरून पुन्हा बीड बस स्थानकाला गेले आहेत ते आता मागच्या कुठल्यातरी गाडीने पुण्याला येतील तर त्यांना शिवाजीनगर येथे त्यांचा मोबाईल हस्तगत करून घ्यायला सांगा. त्यावर ती मुलगी म्हणाली मी पुण्यातच वाघोलीला राहते मी बस स्थानकावर येते आणि तुमच्याकडून मोबाईल घेते. बस पुण्याला पोहोचल्यानंतर तो मोबाईल संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

खाजगी वाहनांनी प्रवास करण्या पेक्षा बस प्रवास नेहमीच सुखाचा व सुरक्षित असल्याचे बोलले जाते. परंतु बस स्थानकावर बसमध्ये चढताना किंवा उतरताना पैसे मौल्यवान दागिने व मोबाईल फोन सारख्या वस्तू चोरीला जाण्याच्या घटना बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी घडतात. एकदा पैसे किंवा दागिने चोरीला गेले कि ते पुन्हा मिळण्याची आशा नसते. पोलीस ठाण्यातही तक्रारी करून त्याचा सहसा फारसा उपयोग होत नाही. मात्र हरवलेली मौल्यवान वस्तू  चालक व वाहकांच्या अथवा प्रवाशांच्या प्रामाणिकपणामुळे परत मिळाल्यास एसटीचा प्रवास अधिकच सुखद होतो असे म्हणता येईल. 

1 Comments

Previous Post Next Post