किल्ले वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न

दि. 06 जानेवारी रोजी किल्ले वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मंगल वाद्यांच्या गजरात मिरवणूक, राजराजेश्वर मंदिरात अभिषेक, वाफगाव ग्रामस्थांच्या हस्ते गड पूजन व ध्वजारोहण, मर्दानी खेळ, होळकर परिवार व दुर्गसंवर्धकांच्या हस्ते राज्याभिषेक, ऐतिहासिक वंशजांच्या हस्ते तळीभंडार, मयूर सूळ लिखित महाराजा-ए हिंद या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन व त्यांच्या जीवनावर सागर मदने यांचे व्याख्यान झाले. शेवटी श्रीमंत भुषणसिंह राजे होळकर व प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन तसेच रक्तदान शिबिर आदी कार्यक्रम पार पाडला. 

या पराक्रमी देशभक्त राजाचे जन्मस्थान मध्ये असलेला वाफगावचा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधून घेतला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या वास्तव्याने ही वास्तु पावन झाली आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार वाफगावचा किल्ला आज 250 वर्षां नंतर संवर्धित होत आहे. संवर्धनाचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. किल्लाच्या संवर्धनासाठी पहिल्या टप्प्यात ७ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. 

किल्ल्याचे संवर्धन काम प्रगतिपथावर असल्याने किल्ल्याच्या वैभवात भर पडली आहे याचा आम्हाला आनंद आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून गडाचे काम होत आहे, येत्या काळात अनेक कामे किल्ल्या मध्ये व गावात आपल्याला करायची आहेत, त्यामुळे पर्यटन वाढेल, रस्ते, पाणी असे अनेक प्रश्न मार्गी लागतील, परिसराचा विकास होईल, ग्रामस्थांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.. हाच आमचा हेतू आहे अशी भावना होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केली. त्यांच्याच नेतृत्त्वात 'होळकर राजपरिवारा' तर्फे राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते.

या सोहळ्यास मा. आमदार पोपटराव गावडे, मा. आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, आमदार बाबासाहेब देशमुख, श्री ढोणे महाराज, श्री गणेश दादा हाके, मा. आमदार रमेश अप्पा थोरात, श्री बाळासाहेब दोलतडे, यशवंतराव पोले यांचे वंशज श्री. वैजीनाथ नाना पोले,समिती सदस्य श्री.पांडुरंग माने श्री सचिन नाईक, श्री रमेश शेंडगे, श्री दिलीप येडेतकर, श्री हेमंत हरारे, श्री समीर निकम, श्री. विठ्ठल पावडे, पूजाताई मोरे, श्री दिपक बोराटे, श्री महेश भुजबळ यांच्यासह यशवंतराव महाराजांवर प्रेम करणारे समाज बांधव व भगिनी, भारतीय लष्करातील काही ज्येष्ठ अधिकारी व संपूर्ण देशातून अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post