जामखेड : संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे पहिले रिंगण जामखेड शहरालगत जमादारवाडी येथील संत वामनभाऊ गड येथे शुक्रवारी (ता.२७) दुपारी तीन वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता.२५) श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी,मातकुळी असा प्रवास करत शुक्रवारी जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथे सकाळी दिंडी दाखल झाली. जामखेड शहरात आगमन होताच, तपनेश्वर येथे श्रीनागेश्वर भजनी मंडळाने टाळ मृदंग विना घेऊन भजन करत सामोरे जाऊन, दिंडीचे स्वागत केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिंडीचे स्वागत करूत, सहभागी झाले.
दरम्यान शहरात ठिकठिकाणी वारकऱ्यांना नागरिकांनी फळे, चहा बिस्कीट, नास्ता औषधे, पाणी व्यवस्था केली होती. शहरातील श्रीविठ्ठल मंदिरात श्रीविठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. तेथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर जगदाळेवस्ती येथे पंगत झाली .
जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिर येथे पालखीचे आगमन झाले. यावेळी जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांचा सन्मान करण्यात आला व रिंगण सोहळा सुरू झाला. मंदिराच्या भव्य प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला. पताकाधारी वारकरी, विणेकरी टाळ मृदंगाच्या तालावर पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.. श्री ज्ञानदेव तुकाराम... गहिनीनाथ महाराज की जय, संत वामनभाऊ महाराज की जय , या जयघोषात भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करू लागले. यावेळी भाविकांनी एकच जय जयकार केला.
वारकरी परंपरेचे खेळिया प्रकरणातील अभंग झाले. यावेळी महंत विठ्ठल महाराज यांनी स्वतः अभंग गायले या अभंगाच्या चालीवर वारकरी वेगवेगळे खेळ खेळले. अनेक पुरुष व महिला भक्तांनी फुगडीचा आनंद लुटला. यावेळी जमादारवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिंगण सोहळ्या दरम्यान या ठिकाणी नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.
जामखेड परिसरातून पंढरपूरला दररोज अनेक दिंड्या जात आहेत. मात्र त्यापैकी संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळा हा सर्वात भव्य दिव्य समजला जातो. जमादारवाडी येथे होणारे रिंगण हे एकमेव आहे. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते. राज्यभरातून सुमारे ३५ हजाराहून आधिक वारकरी हे या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे भोजन करून सारोळा येथे ही दिंडी मुक्कामी पोहोचली.
⚡ छायाचित्रे शरद गर्जे व अशोक वीर