ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नका - चेतन महाराज बोरसे



भक्तिमय वातावरणात श्रीनागेश्वर उत्सवाची सांगता
 

जामखेड प्रतिनिधी 
 "आपल्या मुलांच्या हातात गीता, ज्ञानेश्वरी, गाथा द्या. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नका. आपली संस्कृती आपला धर्म याविषयी मुलांना ज्ञान द्या. नाहीतर पुढील वीस वर्षानंतर चा काळ भयानक असेल" असे प्रतिपादन ह.भ.प. चेतन महाराज बोरसे यांनी केले. 

श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त जामखेड येथे श्रीनागेश्वर पालखी सोहळा, शिवलीलामृत पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण उत्सवाची सांगता श्री. बोरसे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. 

हरीने माझे हरीले चित्त l
भार वित्त विसरले ll

 जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगावर बोरसे महाराज यांनी आपले विचार मांडले. संपूर्ण अभंगाचा भावार्थ सांगून झाल्यानंतर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे गोकुळातले चरित्र वर्णन केले. यावेळी त्यांच्या सुमधुर आवाजात त्यांनी अनेक गवळणी अभंग गायले. ते म्हणाले काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्णाचे चरित्र वर्णन करावे असा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. कोणत्याही उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने अर्थात श्रीकृष्णाचे चरित्र वर्णन केल्याशिवाय होत नाही. "

 बोरसे महाराज पुढे म्हणाले 'भजन हेच आपल्याला तारणारे आहे. त्यामुळे जीवनात प्रत्येकाने भजन करावे. प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचावी आपल्या मुलांना देखील ज्ञानेश्वरी, हरिपाठ, भगवतगीता वाचण्याची सवय लावा. थोडा वेळ देवघराच्या समोर त्यांना बसवा. आज तरुणांना धर्म शिक्षणाची फार मोठी गरज आहे. पुढची पिढी देवभक्त आणि राष्ट्रभक्त झाली पाहिजे. आपल्या मुलांना उच्च शिक्षित जरुर करा परंतु त्याचबरोबर त्यांना धर्मशिक्षणही द्या. आता बऱ्याच शाळांमध्ये मुलांना गंध लावून येण्यास परवानगी नाही. गळ्यात माळ घातलेली त्यांना चालत नाही. हे सर्व कशासाठी चाललंय असा सवाल यावेळी बोरसे महाराज यांनी केला. 
22 वर्षापासून श्रीनागेश्वर सेवा भक्त मंडळ व सप्ताह समितीने यात्रेला धार्मिक वळण देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. याबाबत बोरसे महाराज यांनी मंडळाचे विशेष कौतुक केले. 

  दरम्यान बुधवारी दुपारी आ. रोहित पवार यांनी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी श्रीनागेश्वराची विधीवत पुजा केली. 
तसेच याच दिवशी दुपारनंतर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनीही श्रीनागेश्वराची विधीवत पुजा केली. या दोन्ही मान्यवरांचा समितीच्या वतीने श्री. दिपक महाराज खरात लिखित वैराग्यमहामेरु हा संत गोरोबाकाका यांचा चरित्र ग्रंथ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

  तसेच सातही दिवस प्रा. मधुकर राळेभात यांनी हजेरी लावली. उद्योजक आकाश दिलीप बाफना यांच्या वतीने श्री. बोरसे महाराज यांचा सन्मान करण्यात आला. 

 या उत्सवासाठी पंढरीनाथ महाराज राजगुरू यांनी व्यासपीठ चालक म्हणून काम पाहिले. ओम फुटाणे, हरिदास गुंड, शंकर माळी, बाबा मुरूमकर यांनी मृदंग वादनाची सेवा केली. तसेच जगन्नाथ धर्माधिकारी दादासाहेब सातपुते, दादा आजबे, रावसाहेब कोल्हे, हरिभाऊ जठार, श्रीराम नेटके, हिरालाल नेटके, संतोष राळेभात पाटील, शेषेराव मुरुमकर, त्र्यंबक वराट यांच्यासह परिसरातील भजनी मंडळांनी सप्ताहात भजन कीर्तन सेवेत सहभाग घेतला. 

 या संपूर्ण उत्सवासाठी श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे बाबासाहेब खराडे, बबलू देशमुख, मिलिंद ब्रम्हे, संतोष बारगजे, विनायक राऊत, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, दिलीप कुमार राजगुरू, महादेव पानसाडे, सिताराम राळेभात, उमेश देशमुख, राजेंद्र देशपांडे, दत्तात्रय काळे, सत्येंद्र पाटील, शाम क्षिरसागर, किरण सोनवणे,नंदू शिंदे, दर्शन भोसले, आदित्य पोकळे, ओम भोसले, कृष्णा मिसाळ, रोहित खवळे, रोहन बांदल, सुमित बकरे, आर्यन धनवडे, ओम काकडे, अक्षय राळेभात, रोहित शिंदे, रोहित कोल्हे, सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे, यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेतले. 

Post a Comment

Previous Post Next Post